जिल्ह्यात ४७८ दिवसांपासून कोरोनाचे ठाण कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:19 IST2021-07-15T04:19:48+5:302021-07-15T04:19:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यात ४७८ दिवसांपासून कोरोनाचे ठाण कायम आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्यात जिल्ह्यातील पहिला रुग्ण सापडला. ...

Corona has been stationed in the district for 478 days | जिल्ह्यात ४७८ दिवसांपासून कोरोनाचे ठाण कायम

जिल्ह्यात ४७८ दिवसांपासून कोरोनाचे ठाण कायम

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : जिल्ह्यात ४७८ दिवसांपासून कोरोनाचे ठाण कायम आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्यात जिल्ह्यातील पहिला रुग्ण सापडला. आतापर्यंत एक लाख ५९ हजार १६९ पेक्षा अधिकजण बाधित झाले, तर ४,३०२ मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात कोरोनाला उतार लागला असताना, जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या मात्र चिंता वाढविणारी आहे.

गेल्यावर्षी २३ मार्चला जिल्ह्यातील पहिला कोरोना रुग्ण इस्लामपूर येथे आढळला. त्यानंतर रुग्णसंख्या वाढत गेली. गेल्यावर्षी शिराळा तालुक्यातील मणदूर, जत तालुक्यातील बिळूर ही गावे ‘हॉटस्पॉट’ ठरली होती. दुसऱ्या लाटेत वाळवा तालुका ‘हॉटस्पॉट’ ठरला आहे. मागील वर्षी १९ एप्रिलला विजयनगर (सांगली) येथे पहिला कोरोना मृत्यू नोंदला गेला. नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत कोरोनास्थिती आटोक्यात होती, त्यानंतर पुन्हा रुग्ण वाढू लागले.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत ९ सप्टेंबर २०२० रोजी सर्वाधिक म्हणजे १२७९ रुग्णांची नोंद झाली होती, तर १७ सप्टेंबर २०२०रोजी ३२ मृत्यू झाले होते. ते पहिल्या लाटेतील सर्वाधिक मृत्यू होते. दुसऱ्या लाटेत ६ मे २०२१रोजी सर्वाधिक २३२८ रुग्ण आढळून आले, तर त्याच दिवशी सर्वाधिक ५८ मृत्यूंची नोंद झाली.

पहिल्या लाटेत कोरोना रुग्णांवर उपचारासाठी बेड मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. दुसऱ्या लाटेत मात्र, गावपातळीवरही कोविड सेंटरच्या माध्यमातून उपचाराची सोय झाल्याने रुग्णांचे हाल थांबले.

जिल्ह्यात सध्या सरासरी नऊशे ते हजार नवीन रुग्ण आढळून येत आहेत, तर सरासरी २० मृत्यूची नोंद होत आहे.

सध्या लागू करण्यात आलेल्या निर्बंधांना कोणीही जुमानत नसल्याचे चित्र असून, त्यामुळेच बाधितांची संख्या अद्याप कायम आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांवर स्थिर आहे.

चौकट

जिल्ह्याला उपलब्ध झालेले एकूण डोस : ८,८९६३० कोविशिल्ड, ९०,५४० कोव्हॅक्सिन, एकूण ९,८०,१७०

पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या : ७,३८,९९५ (२४.०६ टक्के)

दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या : २,१२,८०१ (६.९२ टक्के)

चौकट

जिल्ह्यातील सद्यस्थिती

जिल्ह्यातील एकूण बाधित १,५९,१६९

कोरोनामुक्त झालेले १,४४,७६२

आतापर्यंतचे एकूण मृत्यू ४,३०२

चौकट

पहिल्या लाटेतील वयानुसार कोरोना मृत्यू

२० ते ४० : ६८

४० ते ४९ : २०९

५० ते ५९ : ३५५

६० ते ६९ : ५२९

७० ते ७९ : ४३८

८० ते ८९ : १५२

९० वर्षांपुढील : ३३

चौकट

दुसऱ्या लाटेतील वयोगटानुसार एकूण मृत्यू

वय मृत्यूसंख्या

२० ते ४० : १७३

४० ते ४९ : २५२

५० ते ५९ : ४१४

६० ते ६९ : ५७८

७० ते ७९ : ४४२

८० ते ८९ : १८२

९० पुढील : २१

कोट

जिल्ह्यातील कोरोना संसर्ग अद्याप कायम आहे. नागरिकांनी मास्कच्या वापरासह गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. संसर्ग होईल, अशा ठिकाणांवर निर्बंध घालण्याचे आदेश दिले आहेत, तरीही नागरिकांनीही स्वत:हून काळजी घेत प्रशासनास सहकार्य करावे.

डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी

काेट

कोरोना रुग्णसंख्येतील वाढ लक्षात घेता, मास्कचा वापर करावा. सार्वजनिक ठिकाणी जाण्याचे टाळण्यासह नागरिकांनी स्वत: खबरदारी घ्यावी. विनाकारण बाहेर फिरल्यामुळेही संसर्ग वाढत असल्याचे आढळले आहे. कोरोना अद्याप संपला नाही, हे सर्वांनी ध्यानात घेऊन आपली काळजी घेतल्यास संसर्ग टळणार आहे.

- डॉ. संजय साळुंखे, जिल्हा शल्यचिकित्सक

Web Title: Corona has been stationed in the district for 478 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.