वाळवा पंचायत समितीत वादंग

By Admin | Updated: September 18, 2015 23:34 IST2015-09-18T23:27:23+5:302015-09-18T23:34:17+5:30

सभागृह नामकरणाचा प्रश्न : काँग्रेस सदस्यांचा सभात्याग

The controversy in the dry panchayat committee | वाळवा पंचायत समितीत वादंग

वाळवा पंचायत समितीत वादंग

इस्लामपूर : वाळवा पंचायत समितीच्या नवीन इमारतीमधील सभागृहाला लोकनेते राजारामबापू पाटील यांचे नाव देण्यावरुन आज सभागृहात सत्तारुढ राष्ट्रवादी आणि काँग्रेस सदस्यांमध्ये जोरदार वादंग झाले. मात्र सभापती रवींद्र बर्डे यांनी, सहा महिन्यांपूर्वीच हा नामकरणाचा ठराव मंजूर झाला आहे, त्यामुळे त्यावर आता चर्चा होणार नाही, असा पवित्रा घेतल्याने, काँग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग करीत नव्या इमारतीमधील बाकड्यांवर ठाण मांडले.
पंचायत समितीच्या जुन्या इमारतीमधील वसंतदादा सभागृहात शुक्रवारी सभापती रवींद्र बर्डे यांच्या अध्यक्षतेखाली व उपसभापती सौ. भाग्यश्री शिंदे, गटविकास अधिकारी विजयसिंह जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा झाली. या सभेत नामकरणाच्या विषयावरुन प्रचंड गोंधळ माजला. सत्तारुढ राष्ट्रवादी आणि काँग्रेस सदस्यांमध्ये शाब्दीक चकमकी उडाल्या. सत्तारुढ गटाने, हा ठराव सहा महिन्यांपूर्वी झाला आहे, तसेच हा विषय आजच्या सभेच्या विषयपत्रिकेवर नाही, अशी भूमिका घेत काँग्रेसच्या सदस्यांची मुस्कटदाबी केली. त्यामुळे संतप्त काँग्रेस सदस्यांनी सत्ताधाऱ्यांचा निषेध करीत सभात्याग केला.
काँग्रेसच्या प्रकाश पाटील यांनी, पंचायत समितीच्या संपूर्ण नव्या इमारतीला लोकनेते राजारामबापू पाटील यांचे नाव द्या, त्याला आमची हरकत नाही. मात्र पद्मभूषण वसंतदादा पाटील यांचे नाव का नको, याबाबतची भूमिका सत्ताधाऱ्यांनी जाहीर करावी, अशी मागणी केली. त्यांच्या वक्तव्यात सत्तारुढ गटाच्या सदस्यांनी जोरदार अडथळे आणल्यामुळे काहीकाळ गोंधळ माजला.
पाटील म्हणाले, वाळवा तालुक्यातील क्रांतिकारक, समाजसुधारकांची परंपरा लक्षात घेऊन लोकनेते राजारामबापूंसह वसंतदादा पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील, नागनाथअण्णा नायकवडी, पट्ठे बापूराव, अण्णाभाऊ साठे, क्रांतिवीर बर्डे गुरुजी, क्रांतिवीर पांडू मास्तर यांची नावे इमारतीमधील प्रत्येक विभागाला द्या. त्यांच्या या मागणीला काँग्रेसच्या अजित भांबुरे, प्राजक्ता देशमुख, राजश्री माळी या सदस्यांनी पाठिंबा देत, पाटील यांच्यासह सभात्याग केला.
दरम्यान, सभापती रवींद्र बर्डे म्हणाले, नव्या इमारतीमधील सभागृहाच्या नामकरणाचा ठराव सहा महिन्यांपूर्वी मंजूर झाला आहे. वसंतदादांच्या नावाला विरोध करण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे त्यावर आता चर्चा करता येणार नाही. इमारतीमधील प्रत्येक विभागाला नावे देण्याची पध्दत नाही. विरोधकांना बसण्यासाठी विश्रामगृहासह माझे चेंबर, अँटी चेंबर सदैव खुले आहे. तरीही त्यांना स्वतंत्र व्यवस्था हवी असेल, तर तिसऱ्या मजल्यावर उपलब्ध करुन देऊ. (वार्ताहर)

कक्षाबाहेरच्या बाकड्यावर ठाण मांडले
पं. स. सभागृहाच्या नामकरणावरुन आज काँग्रेसचे सदस्य अत्यंत आक्रमक झाले होते. सत्ताधाऱ्यांकडून न्याय मिळणार नाही हे स्पष्ट होताच, त्यांनी सभात्याग करीत नव्या इमारतीमधील सभापतींच्या कक्षाबाहेरील बाकड्यांवर ठाण मांडले. तालुका युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष नजीर वलांडकर यांनी तेथे जाऊन काँग्रेस सदस्यांची भेट घेतली. नामकरणाबाबत काँग्रेस सदस्यांची भूमिका योग्य असल्याने संपूर्ण काँग्रेस पक्षाची ताकद तुमच्या पाठीशी आहे, असे वलांडकर यांनी सदस्यांना सांगितले.

Web Title: The controversy in the dry panchayat committee