राष्ट्रवादी नेत्यांमध्येच भूमिकेचा गोंधळनामा
By Admin | Updated: July 8, 2014 00:45 IST2014-07-08T00:44:09+5:302014-07-08T00:45:43+5:30
मतभिन्नता : आर. आर. आक्रमक, तर जयंतरावांचा संयम

राष्ट्रवादी नेत्यांमध्येच भूमिकेचा गोंधळनामा
अविनाश कोळी ल्ल सांगली
पक्षप्रेम ओसरलेल्या जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी पक्षबैठकीला शेवटची हजेरी लावण्याची औपचारिकता पार पाडली. कुंपणावर थांबलेल्या अशा नेत्यांना ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी प्रेमाची साद दिली, तर गृहमंत्र्यांनी पोलिसी खाक्याप्रमाणे आक्रमक भूमिका घेत ‘चालते व्हा’चे आदेश दिले. राष्ट्रवादीच्या या दोन्ही नेत्यांमधील वेगवेगळ््या भूमिकेमुळे संभ्रमात असलेले कार्यकर्ते अधिकच गोंधळात पडले आहेत.
पक्ष आणि नेते कुठे चुकत आहेत, याबाबतची मनातील खदखद व्यक्त करून कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या बैठकीतच नेत्यांना पक्ष सोडण्याचा इशारा दिला. या बैठकीस दुष्काळी फोरमचे एकमेव नेते, पृथ्वीराज देशमुख उपस्थित होते. विलासराव जगतापांना राष्ट्रवादीने एकतर्फी सोडचिठ्ठी दिली असून, अजितराव घोरपडेंबद्दल पक्ष संभ्रमात आहे. आता आर. आर. पाटील यांच्याविरोधात लढण्याची घोषणाच घोरपडेंनी केल्यामुळे त्यांचा पक्षाशी आता संबंध राहिलेला नाही, असे सांगितले जात आहे.
कुंपणावरील नेत्यांचे काय करायचे, यावर राष्ट्रवादीतच दोन मतप्रवाह आहेत. दिग्गज नेत्यांना हटविण्यापेक्षा त्यांना सोबत घेतल्यास विधानसभेला पक्षाचे बळ अधिक वाढेल, असे मत व्यक्त करणारा एक प्रवाह, तर दिग्गज नेत्यांच्या जाण्याने काहीही फरक पडणार नाही, अशा मताचा एक प्रवाह राष्ट्रवादीत आहे. हीच मतभिन्नता नेत्यांमध्येही दिसत आहे. आर. आर. पाटील यांना कुंपणावरील नेत्यांबद्दल किती राग आहे, याचा प्रत्यय राष्ट्रवादीच्या रविवारी झालेल्या बैठकीत आला. त्यांनी अशा सर्व नेत्यांना फटकारले. अशा लोकांच्या जाण्याने पक्षाला काहीही फरक पडणार नाही. त्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे आवाहन केले. बैठक संपल्यानंतर जयंत पाटील यांनी नेमकी आर. आर. पाटील यांच्याविरोधी भूमिका घेतली. संयमाने, शांतपणे व सोशिकतेने साऱ्या गोष्टी स्वीकारण्याची वेळ आता आमच्यावर आली आहे, असे मत व्यक्त करीत सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका जयंतरावांनी व्यक्त केली.
जगतापांबद्दलचा आदरभावही त्यांनी व्यक्त केला. या दोन्ही नेत्यांच्या परस्परविरोधी भूमिकेमुळे बैठकीला उपस्थित राहिलेल्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा गोंधळ उडाला. विधानसभेसाठी आता नेमके काय करायचे, याबाबत संभ्रम आहे.