दहावीच्या टक्केवारीच्या महापुरात अकरावी प्रवेशाची चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:30 IST2021-08-13T04:30:16+5:302021-08-13T04:30:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : अकरावी प्रवेशासाठी सीईटी रद्द करण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाने प्रवेश प्रक्रियेत गोंधळ निर्माण होण्याची शक्यता ...

दहावीच्या टक्केवारीच्या महापुरात अकरावी प्रवेशाची चिंता
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : अकरावी प्रवेशासाठी सीईटी रद्द करण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाने प्रवेश प्रक्रियेत गोंधळ निर्माण होण्याची शक्यता महाविद्यालयांनी व्यक्त केली आहे. दहावीचा निकाल उच्चांकी लागल्याने प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या रांगा लागणार आहेत. या स्थितीत अनेक विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचे प्राचार्यांनी सांगितले.
दहावी निकालाची टक्केवारी वाढल्याने अकरावीसाठी प्रवेशेच्छुकांचा महापूर येणार आहे. आयटीआय, डिप्लोमासह अन्य काही विद्या शाखा उपलब्ध असल्या तरी अकरावीनंतर पदवीकडे वळणाऱ्यांची संख्या खूपच आहे. दहावीत ९० ते ९९ टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनीही अकरावीकडेच मोर्चा वळवला आहे. त्यामुळे कमी गुणांचे विद्यार्थी गुणवत्ता यादीत तळाला राहणार आहेत. नाईलाजाने त्यांना अन्य शिक्षणक्रमांकडे वळावे लागेल. या स्थितीत अकरावीसाठी प्रवेश प्रक्रिया घ्यावी, असा सूर पालकांतून व्यक्त होत आहे. सीईटी रद्द केल्याने गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याची भीतीही व्यक्त होत आहे.
पॉईंटर्स
१ दहावी उत्तीर्ण विद्यार्थी - ४०,८३५
- अकरावीची प्रवेश क्षमता - ४३,७४०
२ कोणत्या शाखेत किती जागा
- कला १६,६००, वाणिज्य ७,२६०, विज्ञान १७,३८०
बॉक्स
महाविद्यालयांचा कट ऑफ वाढणार
सर्रास विद्यार्थ्यांना दहावीत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. त्यामुळे अकरावी प्रवेशाची गुणवत्ता यादी या गुणवंतांमुळेच भरणार आहे. साहजिकच महाविद्यालयांचा कट ऑफ वाढण्याची चिन्हे आहेत. एरवी डिप्लोमाचा कट ऑफ ९० ते ९५ टक्क्यांपर्यंत असायचा. यंदा अकरावीसाठी तो दिसला तर आश्चर्य नसावे.
कोट
दहावीत चांगले गुण मिळाल्याचा आनंद होता, पण आता अकरावीसाठी गर्दी होणार असल्याने चिंता लागून राहिली आहे. ९३ टक्के गुण असूनही अकरावी मिळेल की नाही याची शंका आहे.
- प्राजक्ता चिंचकर, विद्यार्थिनी, सांगली.
अकरावीसाठी सीईटीची तयारी सुरू केली होती. चांगल्या गुणांसह अकरावी सायन्सला प्रवेश घ्यायचा होता. आता सीईटीअभावी दहावीच्या गुणांवर चांगले महाविद्यालय मिळणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
- सुजय खैरमोडे, विद्यार्थी, मिरज.
कोट
कमी गुणवंतांवर आर्थिक बोजा पडण्याची शक्यता
दहावीला गुणांची टक्केवारी अधिक राहिल्याने गुणवत्ता यादी वाढणार आहे. गुणवंत विद्यार्थी अनुदानित तुकड्यांत सामावले जातील. कमी गुणवंतांना विनाअनुदानित तुकड्यांत प्रवेश घ्यावा लागेल. परिणामी त्यांना प्रवेश शुल्क, शिक्षण शुल्क भरावे लागेल. यामध्ये शासनाने योग्य तोडगा काढावा. सर्व विद्यार्थ्यांना पैशांशिवाय अकरावीला प्रवेश मिळाला पाहिजे यासाठी योजना तयार करावी. प्रवेश शुल्काविषयी आराखडा तयार करावा. प्रवेश प्रक्रियेसंदर्भात शासनाकडून अद्याप कोणतेही आदेश आलेले नाहीत, मार्गदर्शन येताच त्यानुसार प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाईल.
- डॉ. भास्कर ताम्हणकर, प्राचार्य, विलिंग्डन महाविद्यालय, सांगली.