भत्त्यावरील डल्लाप्रकरणी संघटनेची तक्रार
By Admin | Updated: January 28, 2015 00:54 IST2015-01-27T23:39:38+5:302015-01-28T00:54:44+5:30
प्रकाराबाबत संताप : मानधन कापणाऱ्यांवर कारवाईची मागणी

भत्त्यावरील डल्लाप्रकरणी संघटनेची तक्रार
सांगली : पोलिओ लसीकरणाची मोहीम यशस्वी करण्यासाठी ज्या ‘आशा’ वर्कर्सनी मेहनत घेतली, त्यांच्याच मानधनाला कात्री लावत त्यावर डल्ला मारण्याचा प्रकार नुकताच घडला. याविषयी सांगली जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्यावतीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. याप्रकरणी चौकशी करून दोषी असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
भत्ता व मानधनाबाबत झालेल्या या गैरप्रकाराचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. त्यावर संघटनेने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. निवेदनामध्ये त्यांनी म्हटले आहे की, देशभर शून्य ते पाच या वयोगटातील मुलांना पोलिओ लस देण्याची मोहीम सुरू आहे. १८ जानेवारीस सांगली जिल्ह्यात ही मोहीम राबविण्यात आली. ही मोहीम राबविण्यासाठी जिल्हाभर ‘आशा’ कर्मचारी, नर्सिंगचे विद्यार्थी व इतर मुलांनी प्रयत्न केले. त्यांनी मोठ्या उत्साहाने ही मोहीम राबविली. मोहिमेसाठी प्रत्येक नियुक्त कर्मचाऱ्यास ७५ रुपये मानधन व प्राथमिक आरोग्य केंद्रातून लस घेऊन जाण्यासाठी २0 रुपये द्यावेत, असे स्पष्ट आदेश शासनाने दिले आहेत.
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातही अशा पद्धतीने मोहीम राबविण्यात आली. याठिकाणी ‘एनयुएचएम’ (नॅशनल अर्बन हेल्थ मिशन)अंतर्गत आशा कर्मचाऱ्यांनी काम केले. या सर्व कर्मचाऱ्यांना दिवसाला ७५ रुपये मानधन व २0 रुपये प्रवास भत्ता देणे अपेक्षित होते. मात्र प्रवास भत्ता न देता केवळ मानधन देण्याचा प्रयत्न झाला. भत्ता न देण्याचे समाधानकारक उत्तर पालिका प्रशासनाने दिले नाही. पोलिओ लस आरोग्य केंद्रातून घेऊन जाण्याचे २0 रुपये दिले जातात. सर्व कर्मचारी ही लस आरोग्य केंद्रातून घेऊन जातात. त्याबाबतची व्हाऊचरही बनविण्यात आली आहेत. असे असताना हे २0 रुपये जातात कोठे?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी निवेदनात केली आहे.
संघटनेच्या अध्यक्षा मीना कोळी, सचिव उमेश देशमुख, वर्षा ढोबळे यांनी निवेदन दिले. (प्रतिनिधी)