The clock in the hand will determine the lotus beetles | हातातलं घड्याळ, कमळातले भुंगे ठरवणार जतचा आमदार

हातातलं घड्याळ, कमळातले भुंगे ठरवणार जतचा आमदार

श्रीनिवास नागे
विधानसभेच्या जत मतदारसंघात भाजपचं त्रांगडं झालंय. आमदार विलासराव जगताप यांच्याविरोधात त्यांच्याच चिल्ल्या-पिल्ल्यांनी उठाव केलाय म्हणे! अगदी काही दिवसांपर्यंत त्यांच्यासमोर ‘साहेब, साहेब’ म्हणून झुकणाऱ्या नेत्यांनी आता ‘साहेब नकोत’ म्हणून घोशा लावलाय. कुणालाच न जुमानणाºया आणि मनगटशाहीवर नितांत श्रद्ध असणाºया जगतापांना असली पेल्यातली वादळं नवी नाहीत. पण यावेळी बंडकऱ्यांना वरूनच वरदहस्त आहे, म्हटल्यावर त्यांनीही सबुरीनं घेतलंय.
यावेळी काँग्रेस-राष्टÑवादी-भाजपसह सगळ्याच पक्षांतली पावसाळ्यातल्या भूछत्राप्रमाणं उगवणारी विकाऊ फळी काँग्रेसच्या मागं जाणार, विलासराव जगतापांच्या वळचणीला जाऊन बसणार, की यंदा पुन्हा ‘तेरा दिवसांचा नवा आमदार’ करणार हे पाहणं म्हणजे दे-दणादण ‘साऊथ इंडियन’ स्टाईलच्या चित्रपटाचा आनंद घेण्यासारखं मनोरंजक ठरणार आहे.
जत म्हणजे जिल्ह्यातला सर्वांत मोठा तालुका. दुष्काळामुळं इथलं राजकारण पाण्याभोवती फिरणारं. त्यात कधीकधी तालुक्याच्या विभाजन-त्रिभाजनाची फोडणी पडते. आता जत शहरापर्यंत म्हैसाळ योजनेचं पाणी आलंय, पण पूर्वभाग नेहमीच कोरडाठाक. कधी तिथल्या ४२ गावांचा पाणीप्रश्न घेऊन कुणी लढतं, तर कधी ६४ गावांना पाणी देणार म्हणून कुणी उभं राहतं. पण हे मुद्दे ऐन निवडणुकीतच येणारे!
जगतापांनी ज्यांना हात दिला, त्या तम्मणगौडा रवी-पाटील (हे जिल्हा परिषदेत जगतापांमुळंच सभापती झाले, हं!), प्रकाश जमदाडे (यांची पत्नी पंचायत समितीत उपसभापती होती. जगतापांनी त्यांना राजीनामा द्यायला लावला.), डॉ. रवींद्र आरळी (हे निष्ठावंत तथा भाजपेयी) आदी मंडळींनी बंड केलंय. जगतापांचं रोखठोक बोलणं आणि सत्ता पंखाखाली घेणं पक्षातल्या दुढ्ढाचार्यांना आणि वरिष्ठ नेत्यांनाही न पटणारं. त्यात खासदार संजयकाका पाटील यांच्याशी त्यांचा जुना याराना. त्यामुळं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आणि सांगली-मिरजेतल्या रिमोट कंट्रोलवाल्यांनीच या बंडाला खतपाणी घातलंय, अशी कुजबूज ऐकू येतेय. चंद्रकांतदादा ज्या बालगाव मठात जातात, तिथल्या अमृतानंद महास्वामींचं नावही उमेदवार म्हणून पुढं आणलं गेलं, पण नंतर त्यांना थांबवलं गेलं. बागडेबाबांचे शिष्य तुकाराम महाराज यांचं नाव आता पुढं आलंय. त्यांनी पूर्वभागातल्या पाण्याच्या प्रश्नावर उचल खाल्लीय. राजकारणात महाराज-स्वामींची चलती असल्यानं त्यांच्या सुप्त इच्छा उफाळून आल्या असाव्यात. शेजारच्या सोलापुरातलं उदाहरण ताजं आहे म्हणा!
मतदारसंघ २००९ मध्ये खुला झाल्यावर तेव्हा राष्टÑवादीत असलेले ‘किंगमेकर’ जगताप ‘किंग’ होण्यासाठी पुढं आले, पण काँग्रेस-राष्टÑवादीनंच ‘गेम’ केली. काँग्रेसच्या १३ पदाधिकाºयांनी राजीनामे देऊन भाजपचं कमळ हाती घेतलं, तर राष्टÑवादीच्या आर. आर. पाटील गटानं पाठ फिरवली. परिणामी तेव्हा ऐनवेळी भाजपमध्ये जाऊन तिकीट मिळवलेल्या प्रकाश शेंडगेंना केवळ तेरा दिवसांत आमदारकीचा गुलाल लागला. तो इतिहास माहीत असल्यानं २०१४ मध्ये जगतापांनी भाजपची उमेदवारी मिळवली आणि विरोधात गेलेली मंडळीच ‘खूश’ करून खिशात घातली. भाजपचे जगताप, काँग्रेसचे विक्रम सावंत, भाजपनं तिकीट कापल्यानं राष्टÑवादीकडून लढलेले प्रकाश शेंडगे यांच्यात सामना झाला. तो जगतापांनी मारला. पाण्याच्या राजकारणाला जातीय समीकरणांची, आर्थिक गणितांची जोड दिली की, जतमध्ये जिंकता येतं, हे आता सिद्ध झालंय.
जतच्या काँगे्रसमध्ये पतंगराव कदम, प्रकाशबापू, मदन पाटील असे तीन गट होते. आता कदम गट तेवढा राहिलाय. मदनभाऊ गटाच्या सुरेश शिंदेंनी राष्टÑवादीची वाट धरलीय. काँग्रेसकडून विक्रम सावंत यांनी पुन्हा शड्डू ठोकलाय. प्रदेश कार्याध्यक्ष विश्वजित कदम यांचे ते मावसबंधू. त्यामुळं त्यांना कदम गटाचं मोठं पाठबळ. पण जत नगरपालिकेतल्या भांडणांमुळं राष्टÑवादीचे शिंदे, माजी सभापती मन्सूर खतीब विरोधात, तर तिकडं उमदी परिसरातले राष्टÑवादीचे बडे नेते चन्नाप्पा होर्तीकरांशीही सावंतांचा उभा दावा. कारण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत होर्तीकरांना सावंतांनी पाडलेलं. सावंतांना राष्टÑवादीची साथ द्यायची की नाही, हे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ठरवणार. पण सावंतांना खरी आशा असू शकते, ती कमळातल्या नाराज भुंगेºयांकडून येणाºया मकरंदाची...
जाता-जाता : ‘आठवडा आमदार’ (म्हणजे आठवड्यातून फक्त एकदा मुंबईतून जतला येणारे आमदार) असं म्हणून ज्यांना हिणवलं जायचं, ते प्रकाश शेंडगे आता वंचित बहुजन आघाडीकडून इच्छुक आहेत, तर ‘वंचित’चे महासचिव गोपीचंद पडळकर यांनीही संपर्क वाढवलाय. धनगर समाजाची लक्षणीय मतं जतचा आमदार ठरवण्यात कामी येतात. लोकसभेला गोपीचंद पडळकरांनी जतमधून दुसºया क्रमांकाची म्हणजे ५३ हजार मतं खेचली होती. पडळकरांचा ‘वंचित फॅक्टर’ जतमध्ये विधानसभेच्या निकालावरही परिणाम करणार म्हणायचं...
ताजा कलम : भाजपमध्ये दगाफटका झालाच तर राष्टÑवादीचं घड्याळ हातावर बांधून रिंगणात उतरायलाही जगताप मागंपुढं पाहणार नाहीत. नाहीतरी ते जयंत पाटील यांच्याच जुन्या गटाचे. पण मराठा समाजाची व्होट बँक लक्षात घेता, भाजप पायावर कुºहाड मारून घेणार नाही, हेही खरं...

Web Title: The clock in the hand will determine the lotus beetles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.