सफाई कामगारांचा रखडला पगार

By Admin | Updated: July 6, 2014 00:12 IST2014-07-05T23:51:43+5:302014-07-06T00:12:43+5:30

परभणी : महानगरपालिकेतील सफाई कामगारांचा पगार सहा महिन्यांपासून रखडला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

Clean Workers' Compensation Salary | सफाई कामगारांचा रखडला पगार

सफाई कामगारांचा रखडला पगार

परभणी : महानगरपालिकेतील सफाई कामगारांचा पगार सहा महिन्यांपासून रखडला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. कर्मचाऱ्यांच्या पगाराची समस्या मागील काही वर्षांपासून कायम असून मनपाने ठोस पाऊले उचलून कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न मिटवावा, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, महानगरपालिकेमध्ये काम करणाऱ्या सफाई कामगारांच्या पगाराचा प्रश्न शहर महानगरपालिका सफाई कामगार संघटनेने उचलून धरला. यासंदर्भात चौथ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष जे.पी. डांगे यांनाही निवेदन दिले आहे.
सफाई विभागातील कायम व रोजंदारी कामगारांचा पगार सहा महिन्यांपासून थकला आहे. पगारातून कपात केलेली रक्कम खात्यावर जमा केली नाही. त्यामुळे एलआयसी पॉलिसी लॅप्स होण्याच्या मार्गावर आहेत.
या पॉलिसी लॅप्स झाल्या तर त्याची जबाबदारी मनपा प्रशासनावर राहील. मनपाकडून वेळेवर पगार होत नसल्याने सफाई कामगारांना अन्यत्र काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागत आहे.
अशाही परिस्थितीत एक दिवस कामावर न गेल्यास निलंबित करण्याची नोटीस दिली जाते. हा प्रकार तत्काळ बंद करावा व थकित पगार द्यावा, अशी मागणी सफाई कामगार संघटनेने केली आहे. (प्रतिनिधी)
वारसांना नोकरीत घ्या
लाड कमिटीच्या शिफारसीनुसार कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरीत सामावून घ्यावे, १२ वर्षांची पदोन्नती देण्यात यावी, संप काळातील थकित पगार अदा करावा, त्याचप्रमाणे सहा महिन्यांचा थकलेला पगार व कपात केलेल्या रक्कमा तत्काळ खात्यावर जमा कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा पवित्रा स्वीकारावा लागेल, असा इशारा संघटनेने दिला आहे. सफाई कामगारांच्या संदर्भातील १२ मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदनावर अनुसयाबाई जोगदंड, किरण गायकवाड, श्रावण कदम, के.के.भारसाखळे, पिराजी हत्तीअंबिरे, दत्ता खंदारे, पिराजी झिंझुर्डे, मोकिंद ढाले, सुभाष कांबळे, दत्त गवाले, चांदू आराटे, दिलीप चौरंगे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Clean Workers' Compensation Salary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.