सांगलीत मूर्तिदानमध्ये प्रभाग दोन आघाडीवर, पर्यावरणपूरक उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 19:31 IST2025-09-02T19:30:12+5:302025-09-02T19:31:41+5:30
सहा हजार मूर्तींचे विसर्जन

सांगलीत मूर्तिदानमध्ये प्रभाग दोन आघाडीवर, पर्यावरणपूरक उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सांगली : महापालिकेच्या गणेश मूर्तिदान उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमांतर्गत शहरातील प्रभागांतून तब्बल २२९ मूर्तिदान संकलन केंद्र उभारण्यात आले आहे. सर्वाधिक मूर्तिदान प्रभाग दोनमध्ये झाले आहे. पाचव्या दिवशी कृत्रिम कुंड, नदीपात्र व तलावात एकूण ६०२४ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
यंदा महापालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी स्वतंत्र मूर्तिदान केंद्रांची व्यवस्था केली आहे. आयुक्त तथा प्रशासक सत्यम गांधी यांच्या निर्देशानुसार प्रत्येक प्रभागामध्ये दररोज दान आणि विसर्जन होणाऱ्या मूर्तींची नोंद केली जात आहे. अतिरिक्त आयुक्त नीलेश देशमुख, राहुल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील, मुख्य स्वच्छता अधिकारी सचिन सांगावकर, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग समितीचे सहायक आयुक्त, स्वच्छता निरीक्षकही उपक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
प्रभाग समिती एकमध्ये २९, दोनमध्ये १७६, तीनमध्ये ११ व चारमध्ये १३ गणेश मूर्तिदान करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत चारही प्रभाग समिती अंतर्गत ६ हजार २४ मूर्तींचे विसर्जन झाले आहे. तर महापालिकेने साधारणपणे ९ टन निर्माल्य गोळा केले आहे.
प्रभागनिहाय विसर्जन
प्रभाग समिती क्र. १
कुंडात विसर्जन -२३७
नदीपात्रात विसर्जन : ३२००
प्रभाग समिती क्र. २
कुंडात विसर्जन - ८९५
नदीपात्रात विसर्जन-०
प्रभाग समिती क्र. ३
कुंडात विसर्जन -३४०
विहीर- ३३२
प्रभाग समिती क्र. ४
कुंडात विसर्जन - ५२
नदीपात्रात विसर्जन-३९
गणेश तलाव- ७००
महापालिकेकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात असून, त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मूर्तिदान, विसर्जन उपक्रमामध्ये नागरिकांचा वाढता सहभाग हे या उपक्रमाचे यश आहे. या मोहिमेमुळे नदी-नाल्यांचे प्रदूषण रोखण्यात मोठी मदत होईल. - सत्यम गांधी, आयुक्त