सांगली : येथील माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष कदम याच्या खूनप्रकरणी संशयित नीतेश वराळे, सूरज जाधव, तुषार भिसे आणि पसार असलेल्या सिद्धार्थ चिपरीकर व शाहरूख शेख या पाचजणांविरुद्ध जयसिंगपूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. संतोष कदमच्या खून प्रकरणात ‘ॲट्रॉसिटी’चे कलम लावण्यात आले आहे.सांगलीतील माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष कदम याचा खून ७ फेब्रुवारी रोजी कुरुंदवाड-नांदणी रस्त्यावर झाला होता. आदल्या दिवशी तो कुरूंदवाड येथे जातो म्हणून तिघांसमवेत मोटारीतून गेला होता. रात्री उशिरा तो परतला नाही. त्यामुळे दि. ७ रोजी पत्नीने शहर पोलिस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. त्यानंतर दुपारीच त्याचा खून झाल्याचे उघडकीस आले. माहिती अधिकार कार्यकर्ता संतोषच्या खुनामुळे राज्यभर खळबळ उडाली.संतोष यांनी शासकीय कार्यालयातील काही गैरप्रकार बाहेर काढले होते. महापालिकेतील घोटाळ्यांविरुद्ध आवाज उठवला होता. भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी तो महापालिकेवर मोर्चा काढणार होता. मोर्चाची परवानगीही मिळाली होती. दि. ७ रोजी तो मोर्चा काढणार होता. तत्पूर्वीच त्याच्या खुनाची बातमी पुढे आली. या खूनप्रकरणी मोटारीतून गेलेले नितेश वराळे, सूरज जाधव, तुषार भिसे या तिघांना कुरुंदवाड पोलिसांनी अटक केली; तर चिपरीकर व शेख हे दोघे अद्याप पसार आहेत. या खूनप्रकरणात माजी नगरसेवकाचा हात असल्याचा संशय नातेवाइकांनी व्यक्त केला. त्यानुसार चौकशीही झाली; परंतु पुरावा नसल्याचे सांगत पोलिसांनी कारवाई केली नाही.पोलिसांनी ९० दिवसांत दोषारोपपत्र दाखल केले आहे. संशयितांविरोधात ॲट्रॉसिटीचे कलम वाढविण्यात आले आहे. दोघे संशयित पसार असल्यामुळे पोलिसांचा तपास अद्यापही सुरूच आहे. पोलिसांनी तपासात आर्थिक कारणातून खून झाल्याचे सांगितले आहे. मात्र खुनाचे खरे कारण वेगळेच असल्याचा नातेवाइकांचा संशय कायम आहे.
Sangli: संतोष कदम खूनप्रकरणी दोषारोपपत्र दाखल, दोघे संशयित अद्याप पसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 15:16 IST