वारणा नदीकाठाच्या गावात चाराटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:31 IST2021-08-18T04:31:43+5:302021-08-18T04:31:43+5:30
कोकरूड : वारणा पाणलोट क्षेत्रात महापुराच्या पाण्याने शेतीचे, पिकांचे नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्यात पिके कुजल्याने शेतकऱ्यांच्यावर जनावरांच्या ...

वारणा नदीकाठाच्या गावात चाराटंचाई
कोकरूड : वारणा पाणलोट क्षेत्रात महापुराच्या पाण्याने शेतीचे, पिकांचे नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्यात पिके कुजल्याने शेतकऱ्यांच्यावर जनावरांच्या चाऱ्याचे मोठे संकट उभे ठाकले असून ओल्या आणि सुक्या चाऱ्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.
शिराळा तालुक्यात जुलै महिन्याच्या अखेरीस मुसळधार पाऊस झाल्यामुळे वारणा नदीला पूर आला होता. सलग दहा दिवस पुराचे पाणी नदीकाठी असलेल्या पिकात राहिल्याने मणदूरपासून मांगलेपर्यंतच्या गावच्या शिवारातील ऊस, मका, भात, सोयाबीन पिके कुजून गेली आहेत. सततच्या पावसामुळे डोंगर भागातील गवताची वाढही खुंटली आहे. यामुळे या परिसरातील जनावरांना ओल्या चाऱ्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. प्रत्येक घरात दुभत्या गायी, म्हशी असल्याने त्यांना चाऱ्याची मोठी गरज आहे. मात्र, चाऱ्याचा तुटवडा जाणवत असल्याने दूध उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांना ओल्या, सुक्या चाऱ्यासाठी धावपळ करावी लागत आहे.
शिराळा पश्चिम आणि उत्तर भागातील उंचावर असणाऱ्या डोंगरी भागात गवत चारा मुबलक प्रमाणात मिळतो. मक्याचा चाराही उपलब्ध होत असतो. मात्र, त्या परिसरातही अतिवृष्टीमुळे मक्याची, गवताची वाढ योग्य प्रमाणात न झाल्याने सर्व शेतकऱ्यांच्या समोर संकट उभे राहिले आहे. जनावरांच्या संगोपन व दूध वाढीसाठी ओला चारा खूपच महत्त्वाचा असतो. साठवणुकीतला उरलासुरला वाळका चारा पण संपुष्टात आला आहे. नदीकाठी असणारी पिके कुजून गेल्याने येथील शेतकरी दुचाकी, बैलगाडी, चारचाकी वाहनांच्या साहाय्याने मित्र, नातेवाईक यांच्या माध्यमातून गुढे, पाचगणी, मेणी खोरा, पणुब्रे, काळुद्रे आदी डोंगर परिसरातून ओला, सुका चारा जमा करत आहेत.