Sangli: स्मशानभूमी गेली पाण्याखाली, शिगावला रस्त्यावरच करावे लागले दहनसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 15:56 IST2025-07-11T15:56:13+5:302025-07-11T15:56:27+5:30
पर्यायी व्यवस्था करण्याची ग्रामस्थांची मागणी

Sangli: स्मशानभूमी गेली पाण्याखाली, शिगावला रस्त्यावरच करावे लागले दहनसंस्कार
शिगाव : शिगाव (ता. वाळवा) येथील वारणा नदीच्या पात्रालगत असलेली गावाची पारंपरिक स्मशानभूमी दरवर्षी पावसाळ्यात पाण्याखाली जाते. यामुळे गावातील नागरिकांना मृत व्यक्तींचा अंत्यविधी मुख्य रस्त्यावरच करावा लागतो. गुरुवारी गावातील मृतावर असेच दहनसंस्कार ग्रामस्थांना रस्त्यावरच उरकावे लागले.
जोरदार पाऊस झाल्यास नदीपात्रात अचानक पाणी वाढते आणि संपूर्ण स्मशानभूमी जलमय होते. अपुरी व्यवस्था आणि स्थानिक अडचणींचा सामना करत ग्रामस्थांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर रस्त्याच्या समांतर उंचीवर नवीन पर्यायी स्मशानभूमी उभारावी, अशी मागणी ग्रामस्थांमध्ये जोर धरत आहे. अशी सोय झाली तर आपत्तीच्या काळातही नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. ग्रामस्थांच्या या मागणीची दखल घेऊन संबंधित यंत्रणांनी जागेची पाहणी करून आवश्यक निधी मंजूर करून काम हाती घ्यावे, असे आवाहन ग्रामस्थांमधून करण्यात आले आहे.