सांगलीत ५ रोजी जाती अंत परिषद
By Admin | Updated: August 2, 2014 00:20 IST2014-08-02T00:16:10+5:302014-08-02T00:20:00+5:30
मरियम ढवळे : पुरोगामी महाराष्ट्रातच सर्वाधिक जातीभेद

सांगलीत ५ रोजी जाती अंत परिषद
सांगली : महात्मा जोतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतल्याशिवाय एकाही राज्यकर्त्याच्या भाषणाची सुरुवात होत नाही. पुरोगामी महाराष्ट्र म्हणून गवगवा करायचा आणि व्यवहारात मात्र जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करायची, असा प्रकार सुरू आहे, अशी टीका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्या कॉ. मरियम ढवळे यांनी शुक्रवारी सांगलीत पत्रकार परिषदेत केली. जातीभेद संपुष्टात आणण्यासाठी मंगळवार, दि. ५ रोजी सांगलीत जाती अंत परिषद घेण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
त्या म्हणाल्या की, आजही ग्रामीण भागातील दलित समाजाला जीव मुठीत घेऊन रहावे लागत आहे. दलित तरुणाने सवर्ण मुलीशी विवाह केल्यास त्याला मारण्यापर्यंतच्या घटना घडल्या आहेत. आंतरजातीय विवाह करणाऱ्या तरुणांना ठार मारण्याच्या घटना खैरलांजी, सोनई, खर्डा, देवपूळ, सातेगाव, नानेगाव, अहमदनगर येथे घडल्या. या पीडितांना आजही न्याय मिळाला नसून, पुरोगामी म्हणवून घेणारे राज्य सरकार आरोपींना कडक शिक्षा करीत नाही, ही शोकांतिका आहे. जातीय आधारावर होणारा अत्याचार थांबवण्यासाठी आवाज उठविण्यात येणार आहे. जाती अंताला मूठमाती देण्यासाठी जाती अंत परिषद घेण्यात येत आहे. पहिली परिषद नागपूर येथे जानेवारीत झाली. तिला मोठ्याप्रमाणात पाठिंबा मिळाला. परिषदेच्या माध्यमातून बहुजन समाजामध्ये जागृती होत आहे.
सांगलीतील कामगार भवन येथे मंगळवार, दि. ५ आॅगस्ट रोजी दुपारी ११ वाजता जाती अंत संघर्ष समितीची परिषद होणार आहे. माकपचे राज्य समितीचे सदस्य कॉ. कुमार शिराळकर परिषदेचे उदघाटक, तर कवठेमहांकाळ येथील वसंतदादा पाटील महाविद्यालयाचे अधिव्याख्याता प्रा. जी. के. ऐनापुरे अध्यक्षस्थानी असतील. जाती अंत संघर्ष समितीचे निमंत्रक कॉ. शैलेंद्र कांबळे आणि प्रा. माधुरी देशमुख प्रमुख वक्ते आहेत, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)