Municipal Election 2026: सांगलीतील जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालय सुट्टीदिवशी सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 19:07 IST2025-12-18T19:05:16+5:302025-12-18T19:07:46+5:30
शासकीय सुट्ट्यांदरम्यानही उमेदवारांना कोणतीही त्रासदायक होऊ नये, म्हणून कार्यालय परवाना अर्ज स्वीकारण्यासाठी कार्यरत ठेवणार

Municipal Election 2026: सांगलीतील जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालय सुट्टीदिवशी सुरु
सांगली : महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राखीव प्रवर्गावर निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांसाठी जातप्रमाणपत्र पडताळणीसंबंधी महत्त्वाची घोषणा केली आहे. दि. २५ डिसेंबर नाताळ, साप्ताहिक सुट्टीच्या दि. २७ आणि २८ डिसेंबर रोजीही निवडणूकविषयक जात प्रमाणपत्र पडताळणी अर्ज स्वीकारण्यासाठी कार्यालय उघडे राहणार आहे, अशी माहिती जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त नागनाथ चौगुले यांनी कळविले आहे.
नागनाथ चौगुले म्हणाले, महानगरपालिका निवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, राखीव जागांसाठी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना जात प्रमाणपत्राची पडताळणी करणे अनिवार्य आहे. त्यासाठी अर्ज सादर करण्यासाठी अंतिम तारीख दि. ३० डिसेंबर निश्चित करण्यात आली आहे. शासकीय सुट्ट्यांदरम्यानही उमेदवारांना कोणतीही त्रासदायक होऊ नये, म्हणून दि. २५, २७ आणि २८ डिसेंबर या दिवशी कार्यालय परवाना अर्ज स्वीकारण्यासाठी कार्यरत ठेवण्यात आले आहे.
उमेदवारांनी विहित नमुन्यातील ऑनलाइन जातप्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज संकेतस्थळावर भरावा. अर्ज सादर करताना उमेदवारांनी मूळ कागदपत्रे आणि अधिकृत साक्षांकित प्रतींसह प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक असल्याचेही अधिकारी म्हणाले.