सांगली : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीच्या अंमलबजावणीसाठी पाेलिसांनी कडक कारवाई सुरू केली आहे. बुधवारपासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन सुरू झाले असले तरी आठवडाभरापासूनच पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. त्यात विनामास्क फिरणाऱ्या २२७ जणांकडून १ लाख ८ हजार, तर वाहतूक नियमभंग करणाऱ्या ३९९ जणांवर केस दाखल करून त्यांना एक लाख ३० हजार २०० रुपयांचा दंड करण्यात आला आहे. दोन्ही कारवाईत ६२६ जणांकडून दोन लाख ३८ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर अधीक्षक मनीषा दुबुले यांनी कोरोनाविषयक नियमांचे कडक पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तरीही अनेक नागरिक विनाकारण बाहेर फिरून नियमाचे उल्लंघन करण्याबरोबरच कोरोनालाही निमंत्रण देत आहेत.
पोलीस दलाच्यावतीने जिल्ह्यात ७० ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली आहे. यात १७ पोलीस अधिकारी, २१७ पोलीस कर्मचारी, तर १११ होमगार्ड तैनात आहेत. या नाकाबंदीवेळी विनामास्क फिरणाऱ्या २२७ जणांवर कारवाई करीत त्यांच्याकडून एक लाख ८ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, तर इतर ३९९ केसेस दाखल करण्यात आली आहे. विनाकारण फिरणाऱ्या ७१ दुचाकी व १० चारचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. यापुढेही अशी कारवाई सुरूच राहणार असून, नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नये व पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी केले आहे.
चौकट
बेकायदेशीर दारूविक्रीवरही कारवाई
विनाकारण फिरणाऱ्यांवर दंड करतानाच पोलिसांनी बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या दारूविक्रीवरही कारवाई सुरू केली आहे. त्यात १६ ठिकाणी कारवाई करण्यात आली त्यांच्याकडून दहा हजार ३२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.