महापालिकेत भांडवली घरपट्टीचा प्रवेश
By Admin | Updated: September 15, 2014 23:13 IST2014-09-15T22:30:54+5:302014-09-15T23:13:16+5:30
सूचना प्रसिद्ध : प्रक्रिया सुरू, छोट्या घरांसह नव्या बांधकामांना मिळणार दिलासा

महापालिकेत भांडवली घरपट्टीचा प्रवेश
सांगली : भाडेमूल्यावर आधारित घरपट्टीची शेवटची बिले तयार केली जात असतानाच, भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टीची प्रक्रियाही आता सुरू झाली आहे. पुढील वर्षात याची अंमलबजावणी करण्याच्यादृष्टीने महापालिकेची पावले पडत आहेत. नगरपालिका कालावधित बांधलेल्या व ज्यांना अत्यंत कमी घरपट्टी आहे अशा मालमत्तांची घरपट्टी वाढणार असून, नव्या बांधकामांना यापूर्वीच वाढीव घरपट्टी लागू झाल्याने त्यांना या करप्रणालीतून दिलासा मिळणार आहे.
भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टीबाबत आज, सोमवारी महापालिकेने नोटीस प्रसिद्ध केली. यामध्ये त्यांनी नव्या करप्रणालीची पूर्वकल्पना दिली आहे. महाआघाडीच्या कालावधित २ आॅगस्ट २0१0 या कालावधित महापालिका व राज्य शासन यांच्यात सामंजस्य करार झाला होता. या करारानुसार पाणीपट्टी, जलनिस्सारण, घरपट्टी, मालमत्ता विभागांच्या सेवांचे दर व सेवाशुल्कात १५ ते २0 टक्के दरवाढीची अट महापालिकेने मान्य केली आहे. त्यामध्ये भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टीचाही समावेश आहे. यासंदर्भात १ जून २0१३ रोजी महापालिकेने याचा ठरावही केला आहे. यापूर्वी भाडेमूल्यावर आधारित घरपट्टी होती. या जुन्या करप्रणालीत अनेक त्रुटी होत्या. एकाच भागात असलेल्या काही घरांना अडीच हजारावर घरपट्टी असताना, शेजारील खूप जुन्या इमारतीला दोनशे किंवा तीनशे रुपये घरपट्टी आकारली जात होती. त्यामुळेच आता नव्या करप्रणालीची अंमलबजावणी सुरू होणार आहे.
पाच वर्षांपूर्वी महापालिका क्षेत्रातील घरपट्टीत मोठी वाढ झाली आहे. त्यावेळी नागरिकांनी या करवाढीस विरोध केला होता. तरीही महापालिकेने करआकारणी सुरूच ठेवली. महापालिकेच्या स्थापनेपासूनच येथील घरपट्टी अन्य महापालिकांच्या तुलनेत अधिक असल्याची ओरड होत होती. त्यात काहीअंशी तथ्यही होते. मात्र, काही मालमत्तांना कमी कर आकारणी व नव्या मालमत्तांना अधिक कर लावण्यात आला होता. करामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी आता भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी लागू केली जाणार आहे. ज्यांची घरपट्टी गेल्या काही वर्षात भरमसाट वाढली, त्यांची घरपट्टी काहीअंशी कमी होण्याची चिन्हे आहेत. जुन्या व कमी कर भरणाऱ्या मालमत्तांना आता अन्य मालमत्तांप्रमाणे कर भरावा लागणार आहे. प्रत्यक्ष करप्रणाली सुरू झाल्यानंतर याचे परिणाम समोर येतील. (प्रतिनिधी)
लहान घरांना दिलासा
पाचशे चौरस फुटांपेक्षा कमी आकाराच्या घरांना नवी करप्रणाली लागू होणार नाही. त्यामुळे अशा घरांना मोठा दिलासा मिळणार आहे. पाचशे फुटांपेक्षा अधिकच्या घरांना त्या त्या क्षेत्रातील रेडिरेकनर दराप्रमाणे भारांक निश्चित करून घरपट्टी आकारली जाणार आहे.
यंदा जुनीच पद्धत
यावर्षी काढली जाणारी घरपट्टीची बिले जुन्या पद्धतीने भाडेमूल्यावर आधारित असणार आहेत. आॅक्टोबर महिन्यात त्याबाबतच्या नोटिसा दिल्या जाणार आहेत.
असे काढले जाते भांडवली मूल्य
एकूण बांधकाम क्षेत्र Ÿ रेडीरेकनर Ÿ इमारतीचे स्वरुप Ÿ मजला भारांक Ÿ बांधकामाच्या वयाचा भारांक, या गणितातून येणारे उत्तर म्हणजे त्या मालमत्तेचे भांडवली मूल्य. या भांडवली मूल्यास निश्चित केलेल्या भारांकाच्या टक्केवारीने पुन्हा गुणले जाणार आहे. त्यातून घरपट्टी निश्चित केली जाईल. प्रस्तावित भारांक सध्या 0.२५ इतका आहे. त्याचा विचार केल्यास ३0 लाखांच्या भांडवली मूल्याच्या बांधकामास अंदाजे ३ हजार ७६६ रुपये घरपट्टी आकारली जाईल. सामान्य कर, भांडवली मूल्य आणि पाणीपुरवठा लाभ कर अशा उपकरांच्या भारांक निश्चितीवर घरपट्टीचा आकडा कमी-जास्त होऊ शकतो. परंतु या गणितात फारसा फरक पडणार नाही.