शेतीपंपाला १६ तास वीज देणे शक्य
By Admin | Updated: January 29, 2015 00:07 IST2015-01-28T22:59:11+5:302015-01-29T00:07:02+5:30
एम. जी. शिंदे : आष्ट्यात एक्स्प्रेस फिडर बसविल्याने भारनियमन टळले

शेतीपंपाला १६ तास वीज देणे शक्य
आष्टा : एक्स्प्रेस फिडरमुळे ८ तासांऐवजी १६ तास वीज मिळाल्याने आष्टा, कारंदवाडी, मर्दवाडी, मिरजवाडी, दुधगाव परिसरातील १४ ते १५ हजार शेतकऱ्यांना लाभ होणार आहे, असे प्रतिपादन महावितरणचे अधीक्षक अभियंता एम. जी. शिंदे यांनी केले.
यशवंत सह. पाणी पुरवठा संस्था कारंदवाडी, विकास सह. पाणी पुरवठा संस्था मिरजवाडी, इंदिरा जलसिंचन योजना आष्टा, महावीर लिफ्ट इरिगेशन स्किम कारंदवाडी, घुमटभाग लिफ्ट इरिगेशन स्कीम कारंदवाडी, वसंतदादा कारखाना इरिगेशन स्किम व वसंतदादा कारखान्याच्या सहकार्याने सर्व शेतकऱ्यांना नियमित वीज मिळावी म्हणून एक्स्प्रेस फिडर बसविण्यात आला. त्याचे उद्घाटन अधीक्षक अभियंता एम. जी. शिंंदे यांच्याहस्ते झाले. माजी आमदार विलासराव शिंदे अध्यक्षस्थानी होते.
यावेळी महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता यु. ए. काळे, उपकार्यकारी अभियंता व्ही. एम. गोंदील, सहायक अभियंता आय. ए. मुजावर, कनिष्ठ अभियंता व्ही. व्ही. गायकवाड, वाळवाच्या उपसभापती भाग्यश्री शिंदे, सरपंच रूपाली हाके, ‘राजारामबापू’चे संचालक श्रीकांत कबाडे, अनिल गायकवाड, ‘सर्वोदय’चे संचालक रमेश हाके, ‘वसंतदादा’चे संचालक सुनील आवटी, इरिगेशन विभागाचे शामराव पाटील उपस्थित होते.
विलासराव शिंदे म्हणाले, आष्टा परिसरात उन्हाळ्यात अनियमित पाणी पुरवठ्यामुळे उत्पादनात घट होत होती. महावितरणच्या एम. जी. शिंदे व अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचा विचार करून एक्स्प्रेस फिडरला मंजुरी दिली. जादा विजेचा उत्पादन वाढीसाठी वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.
यशवंत गायकवाड यांनी स्वागत, तर डॉ. उमेश कणसे यांनी प्रास्ताविक केले. श्रीकांत कबाडे यांनी आभार मानले. हणमंत गायकवाड, रंगराव पाटील यांनी महावितरणला साडेपाच लाखांचा धनादेश दिला. शिवाजी हाके, अजित चौगुले, अण्णा वाडकर, राजाराम सावंत, पी. एस. पाटील, उपसरपंच पंडित नांगरे उपस्थित होते. (वार्ताहर)