Sangli: स्टेअरिंगचे रॉड तुटल्याने बस धडकली घराला, विजेचा खांबही तुटला; सुदैवाने अनर्थ टळला
By अविनाश कोळी | Updated: August 8, 2023 19:25 IST2023-08-08T19:24:27+5:302023-08-08T19:25:50+5:30
बसमधील विद्यार्थी, प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती

Sangli: स्टेअरिंगचे रॉड तुटल्याने बस धडकली घराला, विजेचा खांबही तुटला; सुदैवाने अनर्थ टळला
कुपवाड : शहरातील कुपवाड- माधवनगर रस्त्यावर देशभक्त आर. पी. पाटील विद्यालयालगत सांगलीहून बामनोलीकडे जाणाऱ्या बसच्या स्टेअरिंगचा राॅड अचानक तुटल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून बस घरावर जाऊन धडकली. या घटनेत विजेचा खांबही तुटला. सुदैवाने मंगळवार असल्याने वीज बंद होती, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. बसमधील विद्यार्थी, प्रवासी किरकोळ जखमी झाल्याचे समजते.
कुपवाड-माधवनगर रस्त्यावर शहरातील देशभक्त आर. पी. पाटील विद्यालयालगत दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली. सांगली आगाराची (क्रमांक एम एच १०, बीटी १००६) ही शहरी बससेवेची बस दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सांगलीहून बामनोलीकडे चालली होती. ही बस आर. पी. पाटील विद्यालयाजवळ आल्यावर या बसच्या स्टेअरिंगचा राॅड अचानक तुटला.
त्यानंतर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस विजेचा खांब मोडून तेथील एका घरावर जाऊन धडकली. या घटनेत घराच्या बांधकामाचा कठडा तुटला असून घरासमोरील शेडच्या पत्र्याचे नुकसान झाले आहे. सुदैवाने मंगळवार असल्याने शहरातील वीज बंद होती. त्यामुळे कोणताही अनर्थ घडला नाही. बसमध्ये बसलेल्या विद्यार्थी प्रवाशांना किरकोळ स्वरूपांचा मार लागल्याची चर्चा आहे. अपघाताची माहिती समजतात शहरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.