लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली: सांगलीवाडीच्या बाजूला नदीपात्रात पोहत असताना लक्ष्मण हरी जाधव (वय ५४, रा. बालसम्राट चौक, सांगलीवाडी) यांच्यावर अजस्र मगरीने हल्ला चढवत त्यांचे डोके जबड्यात पकडले. परंतु जाधव यांनी जबड्यावर हाताने प्रहार करून सुटका केली. पुन्हा मगरीने त्यांच्या खांद्यावर हल्ला चढवला. परंतु कडवा प्रतिकार करत जाधव यांनी मगरीला पळवून लावले. हा थरारक प्रकार बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास घडला.
सांगलीवाडीतील लक्ष्मण जाधव हे नियमितपणे २० ते २२ वर्षांपासून कृष्णा नदीत पोहतात. बुधवारी सकाळी ते पहाटेच्या सुमारास घरातून बाहेर पडले. स्वामी समर्थ घाटासमोर सांगलीवाडीच्या बाजूने ते नदीपात्रात उतरून पोहत होते. सहाच्या सुमारास नदीपात्रात असलेल्या जाधव यांच्यावर अजस्र मगरीने येऊन हल्ला चढवला. त्यांचे डोके मागून बाजूने जबड्यात पकडले. मगरीने हल्ला केल्याचे तत्काळ ओळखून जाधव यांनी क्षणाचाही विचार न करता जबड्यावर हाताने प्रहार सुरू केला. जोरदार प्रतिकार पाहून मगरीने जाधव यांचे डोके जबड्यातून सोडले. त्यामुळे जाधव सावध बनले. परंतु मगरीने पुन्हा त्यांचा डावा खांदा जबड्यात पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा जाधव यांनी त्वेषाने मगरीच्या जबड्यावर हाताने मारले. जाधव यांचा प्रतिकार पाहून मगरीने माघार घेतली. ती पाण्यात निघून गेली. तेव्हा जाधव कसेबसे पोहत पात्राबाहेर आले. नदीकाठावरील नागरिकांनी रक्तबंबाळ झालेल्या जाधव यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले.
मगरीच्या हल्ल्याची माहिती मिळताच उपवनसंरक्षक सागर गवते, वन परिक्षेत्र अधिकारी सर्जेराव सोनवडेकर, वनपाल तुषार भोरे, गणेश भोसले, इक्बाल पठाण, भारत भोसले यांनी घटनास्थळी भेट दिली. जखमी जाधव यांची विचारपूस केली.
काळ आला होता पण..
सांगलीवाडीत जाधव यांच्यावर हल्ला करणारी मगर जवळपास दहा फुटापेक्षा मोठी होती असे सांगण्यात येत आहे. अजस्र मगरीने जाधव यांना जबड्यात पकडले होते. परंतु त्यांच्या धाडसाने सुटका झाली. काळ आला होता पण वेळ आली नव्हती याचा प्रत्यय जाधव यांना आला.
तीन महिन्यांत दुसरा हल्ला
सांगलीत तीन महिन्यांपूर्वी १४ एप्रिल रोजी जलतरणपटू शरद जाधव (वय ५६) यांच्यावर मगरीने माई घाट परिसरात हल्ला केला होता. जबड्यात पाय पकडल्यानंतर त्यांनी दुसऱ्या पायाने प्रहार करून सुटका करून घेतली होती. या घटनेपूर्वी अंकलखोप (ता. पलूस) येथे २ एप्रिल रोजी मगरीच्या हल्ल्यात जखमी झालेल्या अजित गायकवाड या तरुणाचा मृत्यू झाला होता.