Sangli: बांधकाम सुरू असलेल्या घरात बिबट्या घुसला, ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत दरवाजा नसतानाही पत्रे बांबू लावून कोंडून घातला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 15:34 IST2025-12-11T15:32:06+5:302025-12-11T15:34:12+5:30
कोणताही दरवाजा नसलेल्या या घरात बिबट्याला ग्रामस्थांनी शिताफीने कोंडून घातला

Sangli: बांधकाम सुरू असलेल्या घरात बिबट्या घुसला, ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत दरवाजा नसतानाही पत्रे बांबू लावून कोंडून घातला
विकास शहा
शिराळा : चार महिन्यांपूर्वी माळवाडी येथे एका महिलेने बिबट्याला जेरबंद केल्याची घटना ताजी असतानाच, शिराळा तालुक्यातील शिवरवाडी येथे आज, गुरुवारी सकाळी पुन्हा थरारक घटना घडली. नवीन बांधकाम सुरू असलेल्या एका घरकुलात दीड वर्षाची बिबटमादी घुसली. घराला दरवाजे नसतानाही, येथील धाडसी ग्रामस्थांनी त्वरित प्रसंगावधान राखून पत्रे आणि बांबूच्या साहाय्याने बिबट्याला अवघ्या काही मिनिटांत यशस्वीरित्या जेरबंद केले. आतापर्यंत जेवढे बिबटे जेरबंद केले आहेत ते कोणतेही आधुनिक साहित्य न वापरता व बेशुद्ध न करता.
अवघ्या तीन फुटांवर बिबट्या, पण प्रसंगावधान कामास आले
बेंदरे वस्तीत अशोक बेंदरे यांच्या नवीन घरकुलाचे बांधकाम सुरू आहे. नेहमीप्रमाणे ते पाण्यासाठी पाईप आणायला घरात जात असताना, अवघ्या तीन फुटांवर प्लास्टिकच्या बॅरलजवळ त्यांना बिबट्या दिसला. बिबट्याने त्यांच्यावर झेप घेण्याचा प्रयत्न केला. पण अशोक बेंदरे यांनी दाखवलेले धाडस आणि प्रसंगावधान यामुळे ते सुखरूप बाहेर आले. त्यांनी आरडाओरडा करताच अशोक बेंदरे, सहदेव बेंदरे, पोपट बेंदरे, दगडू बेंदरे, नाथा बेंदरे आणि आसपासचे नागरिक तत्काळ एकत्र आले. त्यांनी त्वरित हालचाल करत, तेथे पडलेले पत्रे दरवाज्यांना लावले आणि त्यांना बांबूचा आधार (ठेपा) दिला. अशा प्रकारे, कोणताही दरवाजा नसलेल्या या घरात बिबट्याला ग्रामस्थांनी शिताफीने कोंडून टाकले.
वनविभाग आणि 'सह्याद्री वॉरियर्स'ची तातडीची मदत
याबाबत माहिती मिळताच युवानेते विराज नाईक, निवृत वनक्षेत्रपाल तानाजीराव मुळीक, सरपंच श्रीकांत पाळेकर यांच्यासह अनेक नागरिक घटनास्थळी पोहोचले. नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. वनविभागाला घटनेची माहिती मिळताच उपवनसंरक्षक सागर गवते, सहाय्यक वनसंरक्षक नवनाथ कांबळे, वन क्षेत्रपाल एकनाथ पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अनिल वाजे, वनरक्षक दत्तात्रय शिंदे, स्वाती कोकरे आणि सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्सचे संस्थापक अध्यक्ष सुशीलकुमार गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील रेस्क्यू टीम (युन्नुस मणेर, संतोष कदम, गौरव गायकवाड, पांडुरंग उगळे, दादा शेटके, आदिक शेटके) दोन पिंजऱ्यांसह केवळ एका तासात घटनास्थळी दाखल झाली.
दोन तासांच्या प्रयत्नानंतर बिबटमादी जेरबंद
रेस्क्यू टीमने मुख्य दरवाजाजवळ एक पिंजरा आणि जाळी लावली. अनेक उपाययोजना करून अखेर दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर या बिबट्याला पिंजऱ्यात जाण्यास भाग पाडले. बिबट्या जेरबंद झाल्यावर त्याला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. बिबटमादीला शिराळा येथील वनविभागाच्या कार्यालयात आणण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.मिथुन गुरव यांनी तिची वैद्यकीय तपासणी केली आणि त्यानंतर तिला नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडून देण्यात आले.
बेशुद्ध न करता बिबट्या जेरबंद
सुशील कुमार गायकवाड सह्याद्री वॉरियर्स संस्थापक या संस्थेच्या माध्यमातून असंख्य बिबट व वन्यप्राण्यांना रेस्क्यू केले आहे. आधुनिक साहित्य नसताना आपल्या कौशल्याने उपलब्ध साधनांनी बिबट्या रेस्क्यू करतो तसेच एक ही बिबट्या बेशुद्ध न करता बिबट्या जेरबंद केला.