दोन्ही कॉँग्रेस नेत्यांची भाजपकडे उमेदवारीची मागणी
By Admin | Updated: August 3, 2014 01:50 IST2014-08-03T01:25:47+5:302014-08-03T01:50:18+5:30
पक्षनिरीक्षक सांगलीत : कोणाचीही उमेदवारी निश्चित नाही; जगताप, घोरपडे, डोंगरे यांचा समावेश

दोन्ही कॉँग्रेस नेत्यांची भाजपकडे उमेदवारीची मागणी
सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितराव घोरपडे, विलासराव जगताप, काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य शिवाजी (पप्पू) डोंगरे यांनी भाजप पक्षनिरीक्षकांची आज (शनिवार) भेट घेऊन भाजपकडून उमेदवारीची मागणी केली. यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीत एकच खळबळ उडाली. भाजपचे पक्षनिरीक्षक संभाजीराव पाटील-निलंगेकर, माजी आ. विजय गव्हाणे यांनी याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला. अद्याप कोणाचीही उमेदवारी निश्चित झालेली नाही, एवढेच ते पत्रकार परिषदेत म्हणाले.
सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघामधील भाजपकडून इच्छुक उमेदवारांच्या चाचपणीसाठी व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी आज (शनिवार) भाजपचे निरीक्षक निलंगेकर, गव्हाणे सांगलीत आले होते. आज सकाळपासून इच्छुकांशी चर्चा सुरू होती. यामुळे विश्रामगृहाच्या परिसरात मोठी गर्दी झाली होती. यावेळी आमदार संभाजी पवार, शहर जिल्हाध्यक्ष शेखर इनामदार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड, नीता केळकर, पृथ्वीराज पवार आदी उपस्थित होते.
भाजप पक्षनिरीक्षकांना माजी मंत्री अजितराव घोरपडे, विलासराव जगताप, शिवाजी डोंगरे आदींची भेट घेतली. त्यांच्या चर्चेचा तपशील मात्र मिळू शकला नाही. इच्छुकांबरोबर बंद खोलीत चर्चा करण्यात येत होती. आठही विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवारांनी हजेरी लावली होती. त्यानंतर पक्षनिरीक्षकांनी भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन निवडणुकीसंदर्भात चर्चा केली.
पत्रकार परिषदेत निरीक्षक पाटील-निलंगेकर व विजय गव्हाणे म्हणाले की, जिल्ह्यातील आठही विधानसभा क्षेत्रासाठी प्रत्येकी पाच ते सहा इच्छुकांनी आपणाकडे अर्ज केला आहे. काहीजणांनी थेट राज्यपातळीवरील पक्षनेत्यांकडे उमेदवारीची मागणी केली आहे. याठिकाणचा अद्याप कोणताच उमेदवार निश्चित केलेला नाही. आम्ही आजचा अहवाल पक्षाध्यक्षांकडे सादर करणार आहे. उमेदवार कोण असणार, याची निश्चिती जनतेमध्ये सर्व्हे करुन राज्यपातळीवर पक्ष संघटना करणार आहे. आम्ही फक्त येथील अहवाल देणार आहे. संभाजी पवार यांचेही मत जाणून घेण्यात आले आहे. इतर आमदारांनी थेट पक्ष नेत्यांबरोबर चर्चा केली आहे. सर्वच इच्छुकांनी महायुतीने दिलेल्या उमेदवाराच्या पाठीमागे राहणार असल्याची ग्वाही दिल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)