कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीत बोगस मतदान, विरोधी उमेदवाराचा दोन मतांनी निसटता पराभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 18:24 IST2022-02-14T18:23:20+5:302022-02-14T18:24:02+5:30
कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये प्रभाग १० मध्ये ७ मृत व्यक्तीच्या नावे बोगस मतदान झाल्याने व प्रभाग १६ मध्ये ...

कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीत बोगस मतदान, विरोधी उमेदवाराचा दोन मतांनी निसटता पराभव
कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये प्रभाग १० मध्ये ७ मृत व्यक्तीच्या नावे बोगस मतदान झाल्याने व प्रभाग १६ मध्ये मृत, दुबार, चुकीचे असे १३ बनावट मतदान झाल्याने शेतकरी विकास आघाडी व आरपीआयच्या उमेदवारांचा निसटता पराभव झाला.
त्यामुळे तेथे निवडून आलेल्या उमेदवारांची निवड रद्द करावी, यासाठी जिल्हा न्यायालयात पराभूत उमेदवारांनी तक्रार दाखल केल्याची माहिती ॲड. अमित शिंदे यांनी सोमवारी दिली.
तक्रारदारांचे वकील ॲड. शिंदे म्हणाले की, कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक दहामध्ये शेतकरी विकास आघाडीतर्फे उमेदवारी करणाऱ्या उदय शिवाजीराव शिंदे यांनी निवडून आलेले उमेदवार अब्दुलहमीद ब्रदुद्दीन शिरोळकर यांची निवड रद्द करण्याची मागणी केली आहे. या प्रभागात सात मृत व्यक्तींची नावे मतदार यादीतून कमी केली नसल्याचा गैरफायदा घेऊन सात मृत व्यक्तींच्या नावे बनावट मतदान झाले आहे.
ही बनावट सात मते मिळाल्यामुळे शिरोळकर विजयी झाले आहेत. शिंदे यांचा केवळ दोन मतांनी निसटता पराभव झाला आहे. या मृत मतदानामध्ये निवडून आलेले उमेदवार शिरोळकर यांचे मृत वडील व दोन चुलते यांच्या नावाने देखील बनावट मतदान झाले आहे.
ज्या मृत व्यक्तींच्या नावे बनावट मतदान झाले आहे, त्यांच्या मुलांनी न्यायालयामध्ये शपथपत्र देऊन उदय शिंदे यांच्या म्हणण्याला पुष्टी दिली आहे. त्यामुळे प्रभाग १० ची निवडणूक रद्द होऊन शेतकरी विकास आघाडीचे उदय शिंदे यांची विजयी उमेदवार म्हणून घोषणा करण्याची मागणी त्यांनी केली आहे.