जिल्हा परिषदेत शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादीकडून भाजपची गेम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:19 IST2021-06-26T04:19:41+5:302021-06-26T04:19:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची अवघी सात-आठ महिन्यांची कारकीर्द शिल्लक राहिलेली असताना भाजपमध्ये धुसफुस सुरु झाली ...

BJP's game from NCP in the last phase in Zilla Parishad | जिल्हा परिषदेत शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादीकडून भाजपची गेम

जिल्हा परिषदेत शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादीकडून भाजपची गेम

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची अवघी सात-आठ महिन्यांची कारकीर्द शिल्लक राहिलेली असताना भाजपमध्ये धुसफुस सुरु झाली आहे. वास्तविक गेल्यावर्षी अध्यक्ष बदलावेळीच ताणाताणी झाली होती, पण कोरोनामुळे पक्ष फुटीपासून वाचला होता. आता मात्र अनेक भाजप सदस्य टोकाच्या भूमिकेत आहेत.

अंकलखोपचे सदस्य नितीन नवले यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर धुसफुशीला तोंड फुटले आहे. सोमवारच्या सभेवेळीच भाजप अंतर्गत दोन गट निर्माण झाले होते. ऑनलाईन आणि ऑफलाईन सभेच्या निमित्ताने सदस्यांत दुफळी निर्माण झाली होती. नवलेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाने ती ठळकपणे पुढे आली आहे. नवले हे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्या विधानसभा मतदारसंघातील आहेत. २०१४ मध्ये देशमुखांसोबतच भाजपमध्ये आले होते.

राष्ट्रवादीने भाजपला पोखरायला सुरुवात केली असून, त्यासाठी फार ताकद लावावी लागत नसल्याचे दिसत आहे. भाजपचे आमदार, खासदार व वरिष्ठ नेत्यांचे जिल्हा परिषदेत फारसे लक्ष नाही. एखाद्या सभासमारंभापुरतेच ते व्यासपीठावर असतात. एरव्ही सगळा कारभार सदस्यांच्या मनाप्रमाणे चालतो. याचा फायदा राष्ट्रवादीने घेतला नसता तरच नवल. सध्याच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकालावधी सात-आठ महिनेच राहिल्याने राष्ट्रवादीला सत्ताबदलात रस नाही. पण सदस्यांची फोडाफोडी करुन पुढील निवडणुकीत वाट सोपी करण्याचा प्रयत्न आहे. भाजपचे आणखी दहा-बारा सदस्य घड्याळ बांधणार असल्याचा दावा जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांनी शुक्रवारी केला. आगामी निवडणुकांच्या तोंडावर भाजपसाठी ही बाब चिंतेची ठरेल.

भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी मात्र हा चिंतेचा विषय नसल्याचे सांगत घड्याळ बांधू पाहणाऱ्या सदस्यांना अदखलपात्र केले आहे. सत्तेवर काहीही परिणाम होणार नसल्याचे सांगताना काही सदस्य नेहमीच विरोधी बाजूकडे झुकल्याचेही स्पष्ट केले आहे. आम्हीदेखील काही सदस्यांची बेरीज केली असून सत्ता अबाधित राहील असा दावा केला आहे.

चौकट

नोटीस म्हणजे इतरांना इशारा

राष्ट्रवादीत गेलेले नितीन नवले यांना दोन दिवसांत नोटीस बजावण्यात येणार आहे. पक्षांतरबंदी कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाईचा भाजपचा प्रयत्न आहे. पण हा फक्त अन्य सदस्यांसाठी इशारा ठरु शकतो. कारण जिल्हा परिषदेचा अवघा काही महिन्यांचा कार्यकाळ उरलेला असल्याने नोटिसीला काहीही अर्थ नसेल. नवले यांच्यावर कारवाईची सुरुवात करेपर्यंतच मुदत संपणार आहे. शिवाय त्यांच्या पाठीशी राष्ट्रवादीचेही बळ असणार आहे.

Web Title: BJP's game from NCP in the last phase in Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.