सांगलीत संजय राऊत यांच्या पुतळ्याचे भाजपकडून दहन, पोस्टरही फाडले
By शीतल पाटील | Updated: March 3, 2023 20:43 IST2023-03-03T20:43:06+5:302023-03-03T20:43:13+5:30
सुधीर गाडगीळ यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने कार्यकर्ते नाराज.

सांगलीत संजय राऊत यांच्या पुतळ्याचे भाजपकडून दहन, पोस्टरही फाडले
सांगली : भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने भाजपकडून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. काही कार्यकर्त्यांनी विश्रामबाग चौकात लावलेले शिवसेनेचे फलकही फाडले.
सांगलीत शिवसेनेच्यावतीने आयोजित शिवगर्जना मेळाव्यासाठी खा. राऊत दौऱ्यावर आले होते. येथील भावे नाट्यगृहात मेळावावेळी राऊत यांनी आमदार गाडगीळ यांच्याबद्दल अपशब्द वापरले. सांगलीत आता सोन्या-चांदीचा व्यापार चालणार नाही, शुद्ध भगवाच चालेल,असा टोलाही त्यांनी लगाविला. त्यांच्या वक्तव्याबद्दल भाजपकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.
आ. गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर भाजपच्या कार्यकर्त्यांनी राऊत यांच्या पुतळ्याचे दहन केले. यावेळी त्यांच्या निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या. काहींनी विश्रामबाग चौकातील फलकही फाडला. या आंदोलनात भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शेखर इनामदार, माजी महापौर विवेक कांबळे, संगीता खोत, गीता सुतार, नगरसेविका सविता मदने, लक्ष्मण नवलाई, समाजकल्याण सभापती अनिता व्हनखंडे, कल्पना कोळेकर, उर्मिला बेलवलकर, जमीर कुरणे, अश्रफ वांकर, दीपक माने सहभागी झाले होते.