‘बिब्ब्या’ने जत तालुक्यातील डाळिंब उत्पादक हवालदिल
By Admin | Updated: November 11, 2014 23:17 IST2014-11-11T22:49:30+5:302014-11-11T23:17:42+5:30
लाखोंच्या नुकसानीची शक्यता : शासकीय मदतीची मागणी

‘बिब्ब्या’ने जत तालुक्यातील डाळिंब उत्पादक हवालदिल
उमदी : उमदी परिसरातील डाळिंबाच्या बागांवर वेगाने पसरत असलेला बिब्ब्या रोग आटोक्यात येत नसल्याने, दुष्काळासह दुहेरी संकटात सापडलेला डाळिंब बागायतदार शेतकरी हतबल झाला आहे. डाळिंब बागा दुष्काळातही कमी पाण्यावर जगविल्या आहेत. मात्र हाता-तोंडाला आलेल्या या बागा बिब्ब्या रोगाने पूर्णपणे काढून टाकण्याची वेळ आली आहे. लाखो रुपये खर्च करूनही शेवटी निराशाच शेतकऱ्यांच्या पदरी आलेली आहे. तरी उमदी व परिसरातील डाळिंब बागायतदार शेतकरी शासनाकडून आर्थिक मदतीची अपेक्षा करीत आहेत.
जत तालुक्यात डाळिंब पीक चांगले आले. त्यामुळे यंदाच्या वर्षी हजारो हेक्टरवर डाळिंबाची लागण झाली. मात्र अस्मानी संकटाने तर कहर माजविलाच, त्यातच बिब्ब्या रोगाने बागांवर आक्रमण केले. डाळिंब पिकावर तेल्या (बिब्ब्याचा) वेगाने प्रादुर्भाव होत आहे. हजारो हेक्टर बागा रोगाने काढून टाकाव्या लागत आहेत. काही ठिकाणी बागा काढूनही टाकल्या आहेत. तेल्या बिब्ब्या हा रोग कोणत्याच औषधाला दाद देत नसल्याने हा रोग डाळिंब बागांचा कर्दळकाळ ठरला आहे.
बिब्ब्या रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या डाळिंबाच्या बागा पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत. यामुळे बागायतदार मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागणाच्या चिंतेने बागायतदार हवालदिल झाले आहेत.
अवेळी झालेला पाऊस, दमट हवामान यामुळे डाळिंबाच्या पानांवर, फळांवर या रोगाचा शिरकाव झाला. फळावर तेलकट पडून फळे गळून जात आहेत, डाळिंब फुटून खराब होत आहे. अशा रोगाने वैतागलेला शेतकरी बागाच मुळापासून काढून टाकत आहे. उमदी परिसरात हजारावर हेक्टर डाळिंबाचे क्षेत्र आहे. परंतु या रोगाने ते नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. शासनाने बिब्ब्या रोग नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक औषध उपलब्ध करून देण्याची गरज आहे. सध्या किोणतेही प्रतिबंधात्मक औषध उपलब्ध नाही. औषध विक्रेते मात्र बिब्ब्यावरील औषध म्हणून चुकीचे औषध देऊन फसवणूक करीत आहेत.
अनेकांच्या डाळिंब बागा बिब्ब्याने उद्ध्वस्त झाल्या आहेत. जिवापाड जपलेल्या बागांवर बिब्ब्या रोगाचा फैलाव झाल्याने शेतकरी बेजार झाला आहे. दहा वर्षांपासून दुष्काळाशी येथील शेतकरी सामना करीत आला आहे. शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली आहे. शासनाने उद्ध्वस्त बागांचे पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)