भीमराव माने शिवसेनेच्या वाटेवर
By Admin | Updated: August 1, 2014 23:27 IST2014-08-01T22:57:03+5:302014-08-01T23:27:37+5:30
उध्दव ठाकरेंची घेतली भेट : इस्लामपूरमधून उमेदवारी शक्य

भीमराव माने शिवसेनेच्या वाटेवर
सांगली : राष्ट्रवादीचे कवठेपिरान (ता. मिरज) जिल्हा परिषद गटातील सदस्य भीमराव माने शिवसेनेच्या वाटेवर आहेत. मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची गुरुवारी भेट घेऊन त्यांनी प्रवेशाबद्दल चर्चा केली आहे. खासदार संजय राऊत यांच्या माध्यमातून ते ठाकरे यांना भेटले असून त्यांना इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचे आश्वासन मिळाल्याची चर्चा आहे. तथापि माने यांनी मात्र आपण शिवसेनेत प्रवेश करण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नसून हिंदकेसरी मारुती माने यांचे स्मारक पूर्ण करण्याच्यादृष्टीने उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्याचे सांगितले.
जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते गृहमंत्री आर. आर. पाटील, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्यावर नाराजी व्यक्त करून पक्षातील अनेक नेते आणि कार्यकर्ते शिवसेना आणि भाजपची वाट जवळ करत आहेत. खासदार संजय पाटील, जतचे राष्ट्रवादीचे नेते विलासराव जगताप भाजपमध्ये, तर राष्ट्रवादीचे खानापूरचे माजी आमदार अनिल बाबर यांनी चार दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर लगेच जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक, कवठेपिरान जिल्हा परिषद गटातील सदस्य भीमराव माने यांनी उध्दव ठाकरे यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांच्याबरोबर खासदार राऊतही उपस्थित होते. या भेटीत शिवसेना प्रवेशाबद्दल चर्चा झाली असून, येत्या चार दिवसांत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. ठाकरे यांनी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेची उमेदवारी देण्याची तयारी दर्शविली आहे. मारुती माने यांचे स्मारक तर पूर्ण करण्यात येईलच, पण तुम्हाला प्रवेश केल्याचा पश्चाताप होऊ दिला जाणार नाही, तुमच्या गुणवत्तेची कदर करून न्याय दिला जाईल, असे आश्वासनही ठाकरे यांनी माने यांना दिले आहे. (प्रतिनिधी)