लाडक्या बहिणींना अर्ज पडताळणीची धास्ती, सांगली जिल्ह्यातील चौदा बहिणींनी पैसे नाकारले; संख्या वाढण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 13:13 IST2025-01-23T13:13:11+5:302025-01-23T13:13:36+5:30
जिल्ह्यात ७.७३ लाख लाडक्या बहिणी

लाडक्या बहिणींना अर्ज पडताळणीची धास्ती, सांगली जिल्ह्यातील चौदा बहिणींनी पैसे नाकारले; संख्या वाढण्याची शक्यता
सांगली : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींची पडताळणी होणार आहे. त्याची धास्ती जिल्ह्यातील अपात्र लाभार्थ्यांनी घेतली असून, बुधवारपर्यंत १४ लाडक्या बहिणींनी स्वतःहून अर्ज करीत लाभ नाकारला आहे. येत्या काही दिवसांत हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकांच्या पूर्वी राज्य शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करून पात्र महिलांना महिना १५०० रुपये दिले होते. या योजनेमुळे महायुतीला निवडणुकीत मोठ्या प्रमाणात यश मिळाले. महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे हा सरकारचा उद्देश होता. जिल्ह्यात सात लाख ७३ हजार लाडक्या बहिणी या योजनेचा लाभ घेत आहेत. यापैकी ज्या पात्र नाहीत त्यांनीही अर्ज करून लाभ घेतला आहे.
राज्य शासनाने पात्र महिलांना लाभ देण्याचे संकेत दिले आहेत. पण, विधानसभा निवडणुका संपल्यामुळे राज्य शासनाने अपात्र लाडक्या बहिणींना योजनेतून बाहेर पडण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील १४ लाडक्या बहिणींनी लाभ नाकारला आहे, अशी माहिती महिला व बाल कल्याणच्या अधिकारी वर्षा पाटील यांनी दिली.
कुठे करता येणार अर्ज?
योजनेच्या निकषानुसार अपात्र असलेल्या लाडक्या बहिणींना लाभ सोडण्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बाल विकास जिल्हा परिषद यांच्या नावाने अर्ज करून या योजनेचा लाभ सोडता येणार आहे.
मिरज तालुक्यातून सर्वाधिक दोन लाखांवर अर्ज
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी सर्वाधिक दोन लाख अर्ज हे मिरज तालुक्यातून आले आहेत. यामध्ये अनेक अपात्र महिलांनीही लाभ घेतल्याच्या तक्रारी आहेत. मात्र, जिल्हा समितीकडून अपात्र महिलांची नावे लाडकी बहीण योजनेतून बाद होणार आहेत.
लाभाची वसुली नाही
लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत सहा हप्त्यांचे वितरण झाले आहे. अपात्र लाभार्थ्यांनीही त्याचा लाभ घेतला आहे. दरम्यान, योजनेचा लाभ सोडणाऱ्या महिलांकडून कुठल्याही प्रकारची वसुली होणार नसून, यापुढे लाभ देण्यात येणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
अपात्रतेचे निकष
ज्या महिलांचा परिवार आयकर भरतो, ज्या महिलांकडे चार चाकी वाहन आहे अशा महिलांना आता या योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच इतर सरकारी योजनेचा लाभ घेत असणाऱ्या महिलांना फक्त फरकाची रक्कम मिळेल.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत अपात्र असलेल्या १४ महिलांनी अर्ज करून योजनेचा लाभ सोडला आहे. जिल्ह्यातील अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ सोडण्यासाठी अर्ज करावा. योजनेचा लाभ केवळ पात्र महिलांना देण्यात येणार आहे. - वृषा पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बाल कल्याण