‘कृष्णा’च्या रणांगणात नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यांचाच उतावळेपणा जास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 18:55 IST2020-03-12T18:54:09+5:302020-03-12T18:55:28+5:30
परंतु गेल्या दोन निवडणुकांपासून या निवडणुकीत अविनाश मोहिते यांच्यारुपाने तिसरा गट सक्रिय झाला आहे. अविनाश मोहिते यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केल्याने डॉ. इंद्रजित मोहिते यांना स्वबळावरच निवडणुकीत उतरावे लागणार आहे.

‘कृष्णा’च्या रणांगणात नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यांचाच उतावळेपणा जास्त
अशोक पाटील ।
इस्लामपूर : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत नेत्यांपेक्षा कार्यकर्तेच उतावळे झाल्याचे चित्र आहे. डॉ. सुरेश भोसले, डॉ. इंद्रजित मोहिते व अविनाश मोहिते या प्रमुख तीन गटांमध्येच ही निवडणूक रंगणार आहे.
या निवडणुकीत पारंपरिक मोहिते-भोसले या दोन गटातच लढत होत आली आहे. परंतु गेल्या दोन निवडणुकांपासून या निवडणुकीत अविनाश मोहिते यांच्यारुपाने तिसरा गट सक्रिय झाला आहे. अविनाश मोहिते यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केल्याने डॉ. इंद्रजित मोहिते यांना स्वबळावरच निवडणुकीत उतरावे लागणार आहे. त्यातच मदनराव मोहिते यांनी भोसले गटाशी संधान साधल्याने त्याचा फटका कोणाला बसणार हेही महत्त्वाचे आहे.
अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या संचालक मंडळात राष्ट्रवादीची संख्या मोठी आहे. त्यामुळे भोसले यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांशी संधान साधून संपर्क वाढवला आहे, तर अविनाश मोहिते यापूर्वीच राष्ट्रवादीत गेले आहेत. त्यामुळे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यापुढे पेच निर्माण झाला आहे. डॉ. इंद्रजित मोहिते यांचे पतंगराव कदम यांच्याशी सलोख्याचे संबंध असल्याने मंत्री विश्वजित कदम यांना इंद्रजित मोहिते यांच्या पाठीशी राहतील, असे चित्र आहे.
आपण कराड, वाळवा आणि कडेगाव तालुक्यात दौरे सुरु केले आहेत. कारखान्याच्या माध्यमातून संस्था घशात घालणाऱ्यांविरोधात माझा लढा आहे. त्यामुळे आपण कोणाचीही मदत न घेता स्वतंत्रपणे पॅनेल लढवणार आहोत.
- अविनाश मोहिते,
माजी अध्यक्ष, कृष्णा कारखाना.
हंगाम पार पडल्यानंतरच निवडणुकीच्या रणधुमाळीला गती येईल. आमचे नेते डॉ. इंद्रजित मोहिते, मदन मोहिते आहेत. सध्या मदन मोहिते डॉ. भोसले यांच्या गोटात आहेत. या दोघांच्या निर्णयाची वाट पाहून कोणाला मदत करायची ते ठरवू.
- आनंदराव मलगुंडे,
माजी संचालक, कृष्णा कारखाना.