बोरगावचा ढाण्या वाघ बापू बिरू वाटेगावकर कालवश
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2018 15:06 IST2018-01-16T14:22:09+5:302018-01-16T15:06:46+5:30
बापू बिरु वाटेगावकर यांचे निधन झाले आहे. ते 96 वर्षांचे होते.

बोरगावचा ढाण्या वाघ बापू बिरू वाटेगावकर कालवश
सांगली - जिवंतपणी दंतकथा बनून राहिलेल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातील गावगुंडांच्या आणि खासगी सावकारीविरोधात 40 वर्षे रक्तरंजित लढा देणाऱ्या बापू बिरू वाटेगावकर यांचे वयाच्या ९६व्या वर्षी अल्पशा आजाराने दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास निधन झाले. इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
नव्वदीनंतरही तब्बेत ठणठणीत, वाणी खणखणीत, बुद्धी शाबूत असणाऱ्या बापू बिरू यांच्यावर जुलैमध्ये सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली होती. दणकट अंगकाठी, झुपकेदार मिशा, डोक्यावर पटका, खांद्यावर घोंगडे आणि हातात तळपती फरशी कुर्हाड ही त्यांची वैशिष्ट्ये होती.
कृष्णा खोऱ्यात गोरगरिबांवर अन्याय करणारे खासगी सावकार, महिलांवर अत्याचार करणाऱ्या गुंडांविरोधात बापू बिरु यांनी आवाज उठवला होता. त्यातूनच हत्याचे आरोपही त्यांच्यावर होते. हत्यांची मालिका रचणारे बापू बिरू तीस वर्षे पोलिसांना गुंगारा देत होते. त्यांच्या टोळीपुढे पोलिसांनी हात टेकले होते.
अखेर गावगुंड आणि खासगी सावकारीला चाप लावल्यानंतरच त्यांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली. हत्यांच्या आरोपात त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. ती शिक्षा भोगून ते परतले होते. गावात परतल्यानंतर त्यांनी अध्यात्म आणि धनगर समाजाच्या कार्यासाठी वाहून घेतले होते. भजन, प्रवचनात ते रमले होते. मात्र बोरगावसह वाळवा, कराड तालुक्यात त्यांची दहशत कायम होती. बोरगावचा ढाण्या वाघ म्हणून परिचित असणाऱ्या बापू बिरूंवर मराठी चित्रपटही निघाला होता. काही तमाशा फडांतील वगनाट्येही बापू बिरूंवर बेतली होती. शाहीरांनीही त्यांच्यावर कवने केली होती.