बंदीमुळे भाकड जनावरे कर्नाटकात
By Admin | Updated: August 11, 2015 00:35 IST2015-08-11T00:35:45+5:302015-08-11T00:35:45+5:30
गोवंश हत्या बंदीचा परिणाम : मिरजेत जनावरांची आवक निम्म्यावर

बंदीमुळे भाकड जनावरे कर्नाटकात
सदानंद औंधे - मिरज -गोवंश हत्या बंदीमुळे मिरजेत जनावरे बाजारातील उलाढालीवर परिणाम झाला आहे. भाकड जनावरांची कर्नाटकात मोठ्या प्रमाणात निर्यात सुरू असल्याने मिरजेच्या बाजारात जनावरांची आवक निम्म्यावर आली आहे.
मिरजेत दर बुधवारी भरणाऱ्या बाजारात जनावरे खरेदी-विक्रीची मोठी उलाढाल होती. गोवंश हत्याबंदी कायद्याच्या अंमलबजावणीनंतर मिरजेच्या बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या गाय, जर्सी गाय, बैल आदी जनावरांचे प्रमाण घटले आहे. कर्नाटकात बंदी नसल्याने ही जनावरे विक्रीसाठी कर्नाटकात नेण्यात येत आहेत. कर्नाटकातील अथणी, मुडलगी, जमखंडी, बोरगाव, बेळंकी, अंकली येथील जनावरांच्या बाजारात भाकड जनावरांच्या खरेदी-विक्रीमुळे उलाढाल वाढली आहे.
मिरजेत जनावरे खरेदी करणाऱ्या मांस विक्रेत्यांना पोलीस चौकशीला तोंड द्यावे लागत असल्याने मांस विक्रेत्यांनी मिरजेत भाकड जनावरे खरेदी बंद केली आहे. गाय व बैलांची वाहतूक करताना कापण्यासाठी विक्रीला नेत असल्याच्या संशयावरून वाहने अडविण्यात येत असल्याने रात्रीच्यावेळी चोरून जनावरांची कर्नाटकात वाहतूक सुरू आहे. मिरजेसह कऱ्हाड, फलटण, सातारा, कोल्हापूर येथील जनावरे बाजारातही भाकड जनावरांची आवक घटली आहे. भाकड जनावरांची खरेदी-विक्री सीमाभागातील बाजारात जोरदार सुरू आहे.
प्रतिबंध असलेली जनावरे वगळून म्हैस, रेडा, जर्सी गाय आदी जनावरांची आवक होत असल्याने मिरजेच्या जनावरे बाजारातील उलाढाल निम्म्यावर आली आहे. त्यातच पाऊस व पेरणीच्या हंगामाच्या प्रतीक्षेत जनावरांची आवक आणखीन घटली आहे. बाजारातील एकूण उलाढालीपासून ०.८ टक्के उत्पन्न बाजार समितीला मिळते. बाजारातील उलाढाल कमी झाल्याने बाजार समितीच्या उत्पन्नातही घट झाली आहे.