सांगली : कुपवाड रस्त्यावरील अहिल्यादेवी होळकर स्मारकाजवळ बँक कर्मचारी राहुल महादेव कोळी (वय ३५, रा. साईमंदिरजवळ, ग्रीन पार्क, मिरज) यांना तिघांनी बेदम मारहाण त्यांच्याकडील सोन्याची साखळी आणि आयफोन असा १ लाख ६० हजारांचा ऐवज लंपास केला. याबाबत संजय सदाशिव खांडेकर (वय ३८, रा. अर्जुनवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) याच्यासह तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.फिर्यादी राहुल महादेव कोळी हे मंगळवेढा येथील एचडीएफसी बँकेत कार्यरत आहेत. सोमवारी सायंकाळच्या सुमारास ते मोटारीतून त्यांच्या घरी निघाले होते. त्यावेळी पाठीमागून दुचाकीचालकाने मोटारीच्या समोर येऊन दुचाकी थांबवली. त्यावरुन उतरलेल्या एकाने वाहनाचा दरवाजा उघडून फिर्यादी राहुल कोळी यास बाहेर काढले. त्यास मारहाण केली. त्यामुळे राहुल कोळी हे पालवी हॉटेलच्या दिशेने पळत गेले. त्यानंतर मारहाण करणारा हा मोबाईलवर बोलत तेथेच थांबला होता. काही वेळाने फिर्यादी राहुल हे मोटार घेण्यासाठी पुन्हा तेथे आले. ते मोटारीत बसणार एवढ्यात दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी तरुणांनी राहुल यांना मारहाण केली. त्यांच्या गळ्यातील चार तोळ्याची साेनसाखळी आणि आयफोन जबरदस्तीने हिसकावून घेतला. त्यानंतर तिघांनी तेथून पलायन केले. जखमी राहुल यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सांगलीत बँक कर्मचाऱ्यास मारहाण करून लुटले, कोल्हापुरातील एकासह तिघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 16:02 IST