‘व्हॅलेंटाइन डे’ ऑफरचे चॉकलेट करतंय बँक खातं रिकामे, ऑफरच्या लिंकमधून ऑनलाईन डल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 16:04 IST2022-02-08T14:24:41+5:302022-02-08T16:04:41+5:30
हॅकर्सनी चॉकलेटचे आमिष दाखवून तुमच्या खात्यावर डल्ला मारण्यास सुरुवात केली आहे.

‘व्हॅलेंटाइन डे’ ऑफरचे चॉकलेट करतंय बँक खातं रिकामे, ऑफरच्या लिंकमधून ऑनलाईन डल्ला
शरद जाधव
सांगली : प्रेम व्यक्त करण्याचा दिन अर्थातच ‘व्हॅलेंटाइन डे’चा सप्ताह आता सुरू झाला आहे. चॉकलेट डे, रोझ डेसह रोज एक ‘दिन’ साजरा होणार आहे. नेमकी याचीच संधी साधत हॅकर्सनी चॉकलेटचे आमिष दाखवून तुमच्या खात्यावर डल्ला मारण्यास सुरुवात केली आहे.
‘व्हॅलेंटाइन डे ऑफर्स लिंकवर क्लिक करून माहिती भरा आणि पाच हजारांचे चॉकलेट मिळवा’ या आशयाचे संदेश अनेकांना येत असून, यातील काहींनी चॉकलेटच्या आमिषाने माहिती भरल्यानंतर बँक खात्यातूनच रक्कम वजा होत आहे.
कोणतीही ऑफर दिली की, ग्राहक त्याकडे आकृष्ट होताेच. नेमके हेच हेरून आता हॅकर्सनी लिंक पाठवून आपल्या वैयक्तिक माहितीवर खाते रिकामे करण्यात आल्याची उदाहरणे आहेत. आता ऑनलाइन पद्धतीने पैसे लांबविणाऱ्या टोळीने ‘व्हॅलेंटाइन डे’चे निमित्त साधले आहे.
व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने असलेल्या या ऑफरमध्ये सहभागी होण्यासाठी लिंकवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एका नामवंत कंपनीचे पाच हजार रुपयांचे चॉकलेट मोफत दिली जातील. ‘त्या’ नामवंत कंपनीच्या नावानेच सुरुवात होणारी लिंक असल्याने अनेकांना ही अधिकृत ऑफर असल्याचे वाटत असल्याने लिंकवर क्लिक करीत आहेत.
लिंकवर क्लिक केल्यानंतर लगेचच आपल्या माहितीचा गैरवापर होत नाही, तर ठराविक दिवसांनंतर रकमा वजा झाल्याचे काहींचे म्हणणे आहे. त्यामुळे अशा अनोळखी आणि ऑफरच्या लिंकवर कोणीही आपली माहिती भरू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
लिंकवर क्लिक, पैसे गायब
यापूर्वीही अशाच अनेक ऑफरच्या लिंक मोबाइलवर व्हायरल होत होत्या. यातील लिंकवर केवळ क्लिक केल्यानंतरही अनेकांचे पैसे गेले आहेत. यात तीन ते आठ हजार रुपये बॅंक खात्यातून वजा झाल्याने अशा लिंक धोकादायक ठरू शकतात.
कोणतीही कंपनी कितीही मोठी असली तरी ती अशा लिंकद्वारे कधी ऑफर देत नाही. विक्रेत्यांच्या माध्यमातूनच ऑफर देण्याची शक्यता असते. त्यामुळे यापूर्वी फसवणुकीचे प्रकार घडले असल्याने अशाप्रकारे कोणीही लिंकवर क्लिक करून ऑफर मिळविण्याचा प्रयत्न करू नये, यात फसवणुकीची शक्यता आहे. - दिनेश कुडचे, सायबरतज्ज्ञ