महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला एक स्वीकृत नगरसेवक आले आहे. पक्षाने या पदासाठी कार्यकर्त्यांना एक वर्षाचीच संधी देण्याचे धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार आतापर्यंत आयुब बारगीर, सागर घोडके यांना संधी देण्यात आली. सागर घोडके यांना कोरोनामुळे जादा कालावधी मिळाला. त्यांनी नुकतेच राजीनामा दिल्याने स्वीकृतची एक जागा रिक्त झाली आहे. येत्या शुक्रवारी होणाऱ्या महासभेत स्वीकृत नगरसेवकपदाची निवड होणार आहे.
राष्ट्रवादीतून जमीन बागवान व हरिदास पाटील या दोघांचे प्रस्ताव छाननी पात्र ठरले आहेत. त्यात महापालिका निवडणुकीवेळी जमील बागवान यांना उमेदवारी न देता स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिला होता. त्यामुळे सध्या तरी त्यांचे पारडे जड आहे. हरिदास पाटील यांना सांगलीवाडीतून पक्षाने उमेदवारी दिली; पण त्यांचा पराभव झाला. पाटील यांनी स्वीकृतवर दावा केल्याने राष्ट्रवादीत या पदासाठी रस्सीखेच सुरू आहे. आता जयंत पाटील कुणाच्या पारड्यात वजन टाकतात, याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.