अशोक डोंबाळे
सांगली : जिल्ह्यातील मुख्य रस्ते बऱ्यापैकी झाले आहेत. पण, जिल्हा आणि ग्रामीण रस्ते खड्ड्यातच आहेत. या रस्त्यांवरून प्रवास करताना मणके ढिले होत आहेत. महापूर, अतिवृष्टीमुळे २२५ किलोमीटरचे रस्ते खराब झाले आहेत. या रस्त्यांच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी ७७ कोटी १८ लाख रुपये जिल्हा परिषदेने शासनाकडे मागितले आहेत. पण, चार महिन्यात शासनाने दमडीही दिलेली नाही.
दिघंची ते आष्टा, तासगाव ते सांगली, मिरज ते नागज फाटा, दिघंची ते कवठेमहांकाळ या मुख्य रस्त्यांची कामे झाली आहेत. पण, पलूस, वाळवा, कडेगाव, मिरज आणि शिराळा तालुक्यांतील ४९.९६ किलोमीटर जिल्हा मार्ग खराब झाले आहेत. या मार्गांवरील १३ पूल पूर आणि अतिवृष्टीमुळे वाहून गेले आहेत. ग्रामीण रस्त्यांची अवस्था तर अत्यंत दयनीय झाली आहे. ग्रामीण वर्गातील १७५.५० किलोमीटर रस्ते खराब झाले आहेत. २० पूल वाहून गेले आहेत. वाहून गेलेले पूल आणि रस्त्यांमुळे प्रवास करणेही कठीण झाले आहे.पूल आणि रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी १५ कोटी ९८ लाख रुपयांची गरज आहे. उर्वरित रस्ते आणि पुलांची कायमची दुुरुस्ती करण्यासाठी ६१ कोटी २० लाख रुपयांची गरज आहे. या निधीची राज्य शासनाकडे जिल्हा परिषदेने ऑगस्ट महिन्यात मागणी केली आहे. डिसेंबर निम्मा संपत आला तरीही राज्य शासनाकडून निधी आला नसल्यामुळे रस्ते दुरुस्ती रखडली आहे. रस्त्यावरून प्रवास करताना रस्त्यात खड्डा की, खड्ड्यात रस्ता हेच कळत नाही. यामुळे अनेकांना मणक्याचा त्रास होऊ लागला आहे.
शासनाकडून निधीच नाही : भारती बिराजे
- महापूर आणि अतिवृष्टीमुळे इतर जिल्हा आणि ग्रामीण रस्त्यांचे नुकसान झाले आहे. या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज आहे.- शासनाकडे ७७ कोटी १८ लाखाच्या निधीची मागणी केली आहे. पण, शासनाकडून आतापर्यंत निधी मिळाला नसल्यामुळे कामे थांबली आहेत.- लवकरच निधी मिळेल, अशी अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता भारती बिराजे यांनी दिली.