प्रस्ताव नसणाऱ्यांना पुरस्कार
By Admin | Updated: September 4, 2015 22:40 IST2015-09-04T22:40:02+5:302015-09-04T22:40:02+5:30
जिल्हा परिषद : शिक्षण विभागाचा सावळागोंधळ

प्रस्ताव नसणाऱ्यांना पुरस्कार
सांगली : जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड समितीची बैठक होऊन विशेष महिला शिक्षक गुणवंत पुरस्कार गुरुवारी पडवळवाडी (ता. वाळवा) येथील संजीवनी जाधव यांना जाहीर झाला. मात्र या शिक्षिकेने आपण प्रस्तावच पाठविला नसल्याची तक्रार केल्यानंतर शुक्रवारी शिक्षणाधिकारी व शिक्षण सभापतींनी स्नेहा सूर्यकांत जाधव (रेठरेधरण, ता. वाळवा) यांना पुरस्कार जाहीर करून वादावर पडदा टाकला.शिक्षक दिनानिमित्त जिल्हा परिषदेतर्फे दरवर्षी गुणवंत शिक्षकांना पुरस्कार देण्यात येतो. त्यासाठी गुणवंत शिक्षकांकडून प्रस्ताव मागविले जातात. प्रस्तावांची छाननी करून जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांची निवड समिती त्यातून निवड करते. मात्र राजकारणी मंडळींची शिफारस असल्याशिवाय निवडच होत नसल्याची शिक्षकांची तक्रार आहे. यामध्ये काही प्रमाणात तथ्य असल्याचे शुक्रवारी उघड झाले आहे. पडवळवाडी शाळेतील शिक्षका संजीवनी जाधव यांना यापूर्वी पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी यंदा पुरस्कारासाठी अर्जही केला नव्हता, तरीही त्यांना पुरस्कार जाहीर झाला. त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी जिल्हा परिषद शिक्षण विभागाशी दूरध्वनीवरून संपर्क साधून आपण प्रस्तावच पाठविला नसताना विशेष महिला गुणवंत शिक्षक पुरस्कार कसा जाहीर झाला, असा प्रश्न विचारला.
यावेळी शिक्षण विभागातील अधिकारी आणि निवड समितीमधील पदाधिकाऱ्यांचे डोळे उघडले. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण समिती सभापती लिंबाजी पाटील यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना बोलावून, प्रस्ताव नसताना या शिक्षिकेला पुरस्कार कसा जाहीर झाला, असा सवाल केला. हे गंभीर असून यापुढे असले प्रकार चालणार नाहीत, असा इशारा दिला.
हा गोंधळ लक्षात आल्यानंतर रेठरेधरण येथील शाळा क्रमांक तीनमधील शिक्षिका स्नेहा जाधव यांना हा पुरस्कार जाहीर केला गेला. आमच्या चुकीमुळे पुरस्काराचा गोंधळ झाला आहे, तुम्हाला जिल्हा परिषदेचा पुरस्कार जाहीर झाला असून सत्कार कार्यक्रमासाठी शनिवारी उपस्थित राहा, अशी सूचना लिंबाजी पाटील यांनी केली. (प्रतिनिधी)
निवड समितीबाबत शिक्षकांना शंका
जिल्हा परिषद अध्यक्ष, सर्व सभापती, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी आदी पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांचा निवड समितीत समावेश असतो. या सदस्यांनी प्रस्ताव नसणाऱ्या महिला शिक्षकेस पुरस्कार कसा जाहीर केला, असा प्रश्न उपस्थित केला आहे. प्रस्ताव असणाऱ्या शिक्षकास मात्र डावलण्यात आले. या प्रकारामुळे निवड समितीवर शिक्षक आणि शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली.