बंडखोरीच्या माघारीसाठी प्रयत्न

By Admin | Updated: January 29, 2015 23:39 IST2015-01-29T23:24:07+5:302015-01-29T23:39:20+5:30

महापौर, उपमहापौर निवड : राष्ट्रवादीकडून स्वाभिमानीला मदतीचे साकडे

Attempts for withdrawal of rebellion | बंडखोरीच्या माघारीसाठी प्रयत्न

बंडखोरीच्या माघारीसाठी प्रयत्न

सांगली : महापालिकेच्या उपमहापौरपदावरून सत्ताधारी काँग्रेसमधील धुसफूस अद्यापही सुरूच आहे. बंडखोर वंदना कदम यांच्या माघारीसाठी सत्ताधारी गटाने हालचाली सुरू केल्या आहेत. तर विरोधी राष्ट्रवादीने आज स्वाभिमानी आघाडीला मदतीचा हात देण्याचे साकडे घातले. महापौर व उपमहापौरपदाची निवड ३१ रोजी होत आहे. सत्ताधारी काँग्रेसने महापौरपदासाठी विवेक कांबळे, उपमहापौरसाठी प्रशांत पाटील यांचे अर्ज दाखल केले आहेत. काँग्रेसच्या वंदना कदम यांनी बंडखोरी करीत अर्ज दाखल केल्याने सत्ताधाऱ्यांत अस्वस्थता पसरली होती. पालिकेच्या राजकीय पटलावर पुन्हा एकदा वसंतदादा-पतंगराव कदम गटात संघर्ष सुरू झाला आहे. वंदना कदम यांनी पतंगराव कदम यांच्या आदेशाने अर्ज दाखल केल्याचे सांगून मदन पाटील गटात कोंडीत पकडले आहे. पतंगराव कदम गटाकडून मात्र अशी कोणतीही सूचना देण्यात आली नसल्याचे सांगितले जात आहे. पतंगरावांनी उपमहापौरांचा निर्णय मदनभाऊ, किशोर जामदार व इद्रिस नायकवडी यांनी एकत्रित घ्यावा, अशी सूचना केली होती. त्यांनी कोणत्याही नगरसेवकाचे नाव सूचविले नव्हते, असे स्पष्टीकरण दिले जात आहे.
गुरुवारी दिवसभरात विवेक कांबळे व प्रशांत पाटील यांनी काँग्रेससह विरोधी राष्ट्रवादी, स्वाभिमानीच्या नगरसेवकांची भेट घेतली. बंडखोर वंदना कदम यांच्याशी त्यांनी चर्चा केली. कदम यांचे पती सचिन यांनी आमची बंडखोरी नसल्याचे पुन्हा स्पष्ट केले. त्यामुळे कदम यांचा अर्ज मागे घेतला जाणार का? अशी चर्चा आहे. राष्ट्रवादीनेही संख्याबळाची जुळवाजुळव सुरू केली आहे. चमत्कार घडविणारच, याचा पुनरूच्चार विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी यांनी केला आहे.
या निवडीत स्वाभिमानी आघाडीला चांगलेच महत्व आले आहे. राष्ट्रवादीनेही त्यांच्याकडे मदतीचा हात मागितला आहे. तर काँग्रेसचे नेतेही स्वाभिमानी सदस्यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे आता स्वाभिमानी आघाडीच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)

कदम गटाला डावलल्याने वेगळे परिणाम : इद्रिस नायकवडी
मिरज : माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या सर्वसंमतीने पदाधिकारी निवडीच्या आदेशाचे पालन करण्यात येत नसल्याने, त्याचे वेगळे परिणाम होतील, असा इशारा इद्रिस नायकवडी यांनी दिला. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी सर्वांच्या अपेक्षा फोल ठरविल्याची टीकाही नायकवडी यांनी केली. उपमहापौर निवडीवरून सत्ताधारी गटात सुरू असलेल्या बंडाळीबाबत इद्रिस नायकवडी यांनी सत्ताधारी गटाला जबाबदार ठरविले. माजी मंत्री पतंगराव कदम यांच्यामुळे आम्ही काँग्रेसला साथ दिली. महापालिकेत सत्ता मिळविण्यात कदम यांचाही सहभाग मोठा आहे. महापालिका नेत्यांना आपल्यामुळेच सत्ता आल्याचा गैरसमज निर्माण झाला आहे. कोण किती लोकप्रिय आहे, हे विधानसभा निवडणुकीत दिसून आले आहे. पदाधिकारी निवडीबाबत पतंगराव कदम समर्थकांना निर्णयप्रक्रियेत घेतले नसल्याने त्याचे वेगळे परिणाम होतील, असा गर्भित इशारा इद्रिस नायकवडी यांनी दिला. आम्ही घोटाळेबाजांना साथ देत नसल्याने त्यांना आमची अ‍ॅलर्जी आहे. महापालिकेची विकासकामे ठप्प असल्याने महापालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून सर्वांचा अपेक्षाभंग झाला आहे. आम्ही नागरिकांची कामे करण्यास सत्ताधाऱ्यांना भाग पाडू, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Attempts for withdrawal of rebellion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.