जातीव्यवस्था पुन्हा जन्माला घालण्याचा प्रयत्न, डॉ. अभिजित वैद्य यांनी व्यक्त केली भीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 18:53 IST2025-03-17T18:52:51+5:302025-03-17T18:53:17+5:30
डॉ. तारा भवाळकर यांना भाई वैद्य पुरस्कार प्रदान

जातीव्यवस्था पुन्हा जन्माला घालण्याचा प्रयत्न, डॉ. अभिजित वैद्य यांनी व्यक्त केली भीती
सांगली : नव्या शैक्षणिक धोरणातून, हिंदुत्ववादाच्या विविध भुजांमधून, तर कधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धोरणांमधून देशात नव्याने जातीव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी भीती आरोग्य सेनेचे संस्थापक आणि राष्ट्रीय प्रमुख डॉ. अभिजित वैद्य यांनी व्यक्त केली.
भाई वैद्य फाउंडेशन व आरोग्य सेनेच्या वतीने रविवारी सांगलीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांना लोकनेते भाई वैद्य स्मृती गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. श्वास रुग्णालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी डॉ. अनिल मडके, प्रा. डॉ. गीतांजली वैद्य उपस्थित होते.
यावेळी डॉ. वैद्य म्हणाले, देशात वैदिक व अवैदिक हा दोन विचारांचा संघर्ष प्रदीर्घ काळापासून चालत आला आहे. अनेकविध मार्गाने विजय मिळवत बऱ्याचदा वैदिक विचार पुढे जाताना दिसतो. सध्या देशात याच विचारातून लोकसंस्कृती संपविण्याचा प्रयत्न सुरू आहे. लोकसंस्कृती हीच खरी देशाची संस्कृती आहे. लोकांच्या जगण्यातून या संस्कृतीचे विविध प्रवाह तयार होतात. लोकसंस्कृतीमधील राम व रामायण वेगळ्या रूपातले आहे. आता विशिष्ट पद्धतीचा राम आपल्यावर लादला जातोय.
डॉ. तारा भवाळकर म्हणाल्या, कमालीची तत्त्वनिष्ठता भाई वैद्य यांनी आयुष्यभर जपली. समाजासाठी त्यांनी केलेला त्याग मोठा आहे. ज्ञानाचा उपयोग व्यवहारात करून समाजाला योग्य दिशा देण्याचे काम त्यांनी केले. भांडवलशाहीचा प्रभाव असणाऱ्या काळात प्रश्नांना भिडून त्यांनी त्यांचे कार्य उभे केले. साम्यवाद व भांडवलशाही या दोन वेगवेगळ्या गोष्टी असल्याने त्याची सरमिसळ त्यांनी होऊ दिली नाही. त्यामुळे त्यांच्या नावाचा स्मृती पुरस्कार मिळाल्याबद्दल मला समाधान वाटते.