तासगावला पालिकेचे वातावरण तापणार
By Admin | Updated: July 4, 2014 00:47 IST2014-07-04T00:43:34+5:302014-07-04T00:47:10+5:30
आबा-काका गट आमने-सामने : नगराध्यक्ष निवडणुकीत रंगत येणार

तासगावला पालिकेचे वातावरण तापणार
तासगाव : नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर तासगावच्या नगरपालिकेतील वातावरण तापणार आहे. आता या निवडणुकीच्या कार्यक्रमाकडे नजरा लागून राहिल्या आहेत. नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी आतापासूनच फिल्डिंग लावली आहे. गृहमंत्री आर. आर. पाटील (आबा) व खा. संजयकाका पाटील गट आमने-सामने उभे ठाकणार आहेत. त्यातच पुढचे आरक्षण खुल्या गटासाठी असल्याने जोरदार चुरशीचे संकेत मिळत आहेत.
पालिकेच्या निवडणुकीनंतर पालिकेत गृहमंत्री आर. आर. पाटील गटाचे १०, खा. संजयकाका पाटील गटाचे ८ व काँग्रेस १ असे बलाबल होते. संजयकाका गटात दोन अपक्ष नगरसेवकांचा समावेश आहे. सुरुवातीचा एक वर्षाचा नगराध्यक्षपदाचा काळ आर. आर. पाटील गटाकडे होता. त्यावेळी विजयाताई जामदार नगराध्यक्ष झाल्या. त्यानंतर सध्या संजयकाका पाटील गटाकडे नगराध्यक्षपद आहे. सिंधुताई वैद्य विद्यमान नगराध्यक्षा आहेत. आता यापुढे दीड वर्षाची मुदत आर. आर. पाटील गटाला व नंतरची एक वर्षाची संजयकाका गटाला, असे ठरले होते. परंतु या दोन नेत्यांची ऐक्य एक्स्प्रेस मध्येच रुळावरून घसरल्याने या निवडीही प्रतिष्ठेच्या बनणार आहेत.
गृहमंत्री आर. आर. पाटील व खा. संजय पाटील यांच्यातील एकीकरणात पालिकेची निवडणूक पार पडली होती. त्यामुळे पक्षीय पातळीवर पालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा लागला. निवडणुकीनंतर या दोन नेत्यांतील दुराव्यामुळे तयार झालेले राजकीय वातावरण उद्याच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडणुकीत महत्त्वाचे आहे. त्यात विधानसभा निवडणूकही तोंडावरच असल्याने याला जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे.
विद्यमान नगराध्यक्षा सिंधुताई वैद्य यांची मुदत २२ जून रोजीच संपुष्टात आली होती. परंतु मुदतवाढीच्या निर्णयामुळे निवडीचा विषयच मागे पडला होता. परंतु या फेरनिर्णयानंतर आता तो चर्चेत आला आहे. बुधवार, दि. २ रोजी रात्रीपासूनच या निर्णयाबाबतची चर्चा शहरातील कार्यकर्त्यांत सुरू होती. आज (गुरुवारी) दिवसभर हाच विषय चर्चीला जात आहे. (वार्ताहर)