आटपाडी : आटपाडी शहरातील साई मंदिर ते साठेनगर रस्त्याचे काम करताना मंदिराच्या सभामंडपाचा काही भाग पाडल्याचा निषेध भाजप युवा मोर्चातर्फे गुरुवारी सकाळी करण्यात आला. यावेळी शिंदेसेनेचे कार्यकर्तेही तिथे आले. त्यामुळे भाजप व शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. त्यामुळे आटपाडी शहरात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.आटपाडी शहरातील साईमंदिर ते साठे चौक दरम्यान होणाऱ्या या रस्त्याच्या कामास सुरुवात झाल्यावर श्री. सिद्धनाथ मंदिरापुढील मंडपाचा काही भाग पाडण्यात आला. या मुद्द्यावरून राजकीय संघर्षाची ठिणगी पडली. भाजप युवामोर्चाचे अध्यक्ष अनिल पाटील यांनी रस्त्याच्या बाजुला असलेली अतिक्रमणे काढा, तसेच पाडलेला सभा मंडप पुन्हा उभा करा, अशी भूमिका घेत निषेध केला. त्यानंतर रस्त्याचे काम बंद पाडले होते.यावर श्री सिद्धनाथ मंदिराचे पावित्र्य राखत रस्त्याचे काम पूर्ण करण्याची आणि सभामंडप पूर्ववत करण्याची ग्वाही ठेकेदाराने गुरुवारी सकाळी दिली. त्यामुळे मंदिरानंतरच्या रस्त्याचे काम पुन्हा सुरू करण्यात आले.
दरम्यान, गुरुवारी सकाळी भाजप, शिंदेसेना गट, श्री. सिद्धनाथांचे भाविक, नागरिक आणि ठेकेदार मंदिराजवळ जमले. यावेळी भाजप-शिंदेसेना गटातील कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. एकमेकांवर आरोप व प्रत्यारोप झाले. मंदिरासमोरील आणि सटवाई मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमण हा स्थानिक वादाचा मुद्दा पुढे करून त्या अडून होणाऱ्या राजकारणातून ही वादावादी सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
म्हणून निषेध आंदोलन : अनिल पाटीलश्री. सिद्धनाथ मंदिराच्या विरुद्ध बाजूला थोडा रस्ता घेतला असता, तर मंदिराच्या मंडपाला धक्का लागला नसता. त्यामुळे आम्ही भाजप युवा मोर्चाच्यावतीने निषेध आंदोलन केले. ठेकेदाराने मंदिराच्या पाडलेल्या मंडपाचे काम पूर्ववत करण्याची ग्वाही दिल्याने पुन्हा काम सुरू करण्यास परवानगी दिली आहे, असे अनिल पाटील यांनी सांगितले.
रस्त्याच्या अडकाठी नको : दत्तात्रय पाटीलरस्ता सोडून अन्य भागातील अतिक्रमण आणि अन्य कारवाईबाबत नगरपंचायत योग्य तो निर्णय घेईल. चांगला रस्ता होण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. परंतु, स्थानिक राजकारणासाठी नागरिकांच्या सोयीच्या रस्ता करताना मंदिराचे कारण पुढे करून आडकाठी आणणे चुकीचे आहे, असे मत शिंदेसेनेचे दत्तात्रय पाटील यांनी व्यक्त केले.