मानद वन्य जीव रक्षक पदांवर आता महिलांच्याही नियुक्त्या, निवडीची प्रक्रिया सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 18:09 IST2025-10-06T18:09:33+5:302025-10-06T18:09:45+5:30
तालुकास्तरावरही नियुक्त्या

मानद वन्य जीव रक्षक पदांवर आता महिलांच्याही नियुक्त्या, निवडीची प्रक्रिया सुरू
सांगली : मानद वन्य जीव रक्षक पदांवर आता महिलांच्याही नियुक्त्या केल्या जाणार आहेत. राज्याच्या वन विभागाने तसा निर्णय घेतला असून त्यासाठी अर्जही मागविले आहेत. राज्यात या पदांवर प्रथमच महिलांच्या निवडी केल्या जात आहेत.
सध्या प्रत्येक जिल्ह्याला एक पुरुष मानद वन्य जीव रक्षक कार्यरत आहे. या पदाचा कार्यकाल तीन वर्षांचा असतो. तो नुकताच संपल्याने नव्याने अर्ज मागविण्यात आले होते. त्यासाठी राज्यभरातून पुरुष वन्य जीव कार्यकर्त्यांनी अर्ज केले. यादरम्यान, या पदांवर महिलांचीही नियुक्ती करण्याचा निर्णय वन विभागाने घेतला. त्यामुळे पुरुषांचे अर्ज रद्दबातल करण्यात आले.
महिलांच्या समावेशासह नव्याने अर्ज मागविण्यात आले. सध्या निवडीची प्रक्रिया सुरू आहे.
वन्य जीव संरक्षण कामात महिलांचाही सहभाग असावा या हेतूने महिलांचे अर्ज मागविण्यात आले आहेत. राज्यभरात वन्य जीव क्षेत्रात महिला कार्यकर्त्यांचे प्रमाणात तुलनेने कमी आहे. त्यामुळे आजवर पुरुष कार्यकर्तेच या पदासाठी अर्ज करायचे. मानधन अथवा वेतनाशिवाय स्वयंसेवी स्वरूपात हे काम करावे लागते. मात्र त्याला कायदेशीर अधिकार मोठे आहेत.
तालुक्यालाही रक्षक नेमणार
आजवर प्रत्येक जिल्ह्याला एक मानद वन्य जीव रक्षक होता. नव्या निर्णयानुसार आता तालुक्यांनाही प्रत्येकी किमान दोन वन्य जीव रक्षक नियुक्त केले जाणार आहेत. जिल्ह्याचा वन्य जीव रक्षक जिल्हाभरात पोहोचून काम करण्यावर मर्यादा येत असल्याने तालुक्यांनाही नियुक्तीचा निर्णय घेण्यात आला. राज्यभरात या पदांवर महिलांसाठी ५० टक्के आरक्षण ठेवण्यात आले आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या संपली असून निवडीची प्रक्रिया सुरू आहे. सांगली जिल्ह्यासाठी १८ पुरुष आणि ७ महिलांचे अर्ज आले आहेत. जिल्ह्याची संख्याही एकवरून दोन केली जाणार आहे.
मानद वन्य जीव रक्षक पदासाठी नियुक्ती प्रक्रिया सध्या सुरू आहे. जून महिन्यात अर्ज मागविण्यात आले असून त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. महिलांनाही या पदावर नियुक्तीचा निर्णय शासनाने घेतला आहे. - अजितकुमार पाटील, माजी मानद वन जीव रक्षक, सांगली