इग्नू विद्यापीठातील ज्योतिष अभ्यासक्रमाला अंनिसचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:19 IST2021-06-28T04:19:48+5:302021-06-28T04:19:48+5:30
इस्लामपूर: नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (इग्नू) सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून ज्योतिष विषयातील दोन वर्षाचा ...

इग्नू विद्यापीठातील ज्योतिष अभ्यासक्रमाला अंनिसचा विरोध
इस्लामपूर: नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (इग्नू) सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून ज्योतिष विषयातील दोन वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम (एम.ए. ज्योतिष) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय तरुणाईला अवैज्ञानिक भाकडकथांमध्ये गुंतवणारा आहे, असा आरोप करत महाअंनिसच्या खगोलशास्त्र प्रबोधन विभागाच्या डॉ. नितीन शिंदे आणि अविनाश पाटील यांनी विरोध दर्शविला आहे.
डॉ. शिंदे म्हणाले, ग्रह ता-यांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम, पंचांग, मुहूर्त, कुंडली आणि ग्रहणवेध आदी विषयांची विद्यार्थ्यांना माहिती करून देण्यासाठी सदर अभ्यासक्रम सुरू करीत असल्याचे इग्नूने म्हटले आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेली ३० वर्षे खगोलविज्ञानाचा प्रसार करीत आहे. फलज्योतिषाचा फोलपणा प्रबोधनाच्या माध्यमातून समाजासमोर सातत्याने मांडत आलेली आहे. या अभ्यासक्रमाला ठाम विरोध करत आहोत.
ते म्हणाले, एका बाजूला भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) तरुणाईला सोबत घेऊन चंद्राला अथवा मंगळाला गवसणी घालण्यासाठी प्रयत्न करीत आहे आणि दुसऱ्या बाजूला इग्नूसारखे नामांकित विद्यापीठ समाजातल्या काही मूठभर लोकांचे हितसंबंध जपण्यासाठी तरुणाईला ज्योतिषाची पदवी बहाल करीत समाजाला कडक मंगळ आणि शनिच्या साडेसातीत अडकवणार आणि सोडवणार असेल, तर ही कृती संविधानविरोधी आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या इग्नूसारख्या विद्यापीठातून समाजाला अंधश्रद्धेच्या खोल गर्तेत ढकलणारे शिक्षण देणे ही सरकारची प्रतिगामी कृती आहे.