सांगली जिल्ह्यातील मराठा तरुणाईची उद्योगधंद्याकडे झेप; सात वर्षांत किती कोटींचे कर्ज वाटप केले.. जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 18:38 IST2025-09-18T18:37:46+5:302025-09-18T18:38:47+5:30
महामंडळाला चालू २०२५-२६ या आर्थिक वर्षात तब्बल ७५० कोटींचा निधी शासनाकडून मंजूर

सांगली जिल्ह्यातील मराठा तरुणाईची उद्योगधंद्याकडे झेप; सात वर्षांत किती कोटींचे कर्ज वाटप केले.. जाणून घ्या
सांगली : मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास, पण स्वयंपूर्णतेची उमेद बाळगणारे तरुण-तरुणी स्वतःच्या पायावर उभे राहून उद्योग-व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न पाहतात. या स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्याचे बळ अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ अनुदानाच्या माध्यमातून देत आहे. महामंडळाच्या माध्यमातून मागील सात वर्षांत तब्बल ९ हजार १०१ जणांना विविध बँकांच्या माध्यमातून ९१८ कोटी ५४ लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे, तर यातील ८ हजार ३१२ लाभार्थ्यांना महामंडळाने ८८ कोटी ९३ लाख रुपयांचा व्याज परतावा अनुदान रूपात दिला आहे.
नोकरी मागण्यापेक्षा व्यवसाय करून स्वतः मालक बनू इच्छिणाऱ्या मराठा समाजातील तरुण-तरुणींच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे. त्यासाठी तरुणांना राज्य शासन अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून उद्योग व्यवसायासाठी अर्थसाहाय्य करते. महामंडळ उद्योग व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांना वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना व गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजनेच्या माध्यमातून बँकांकडून कर्ज उपलब्ध करून देते.
योजनेचे लाभार्थी बँकेला मंजूर कर्ज व त्याचे व्याज हप्ते स्वरूपात भरतात. त्यानंतर लाभार्थी महामंडळाकडे भरलेल्या व्याजाच्या रकमेची मागणी करतात. मागणीनंतर लाभार्थीने जितके व्याज बँकेत भरले आहे तितक्या व्याजाचा परतावा महामंडळाकडून अनुदान स्वरूपात लाभार्थींना केला जातो. एक प्रकारची महामंडळाची ही बिनव्याजी कर्ज योजना आहे. बँकेत भरलेले व्याज महामंडळ लाभार्थींना परत देऊन त्याच्या उद्योग व्यवसायास अर्थसाहाय्य करते.
७५० कोटींच्या निधीद्वारे योजनांना गती
मराठा समाजातील युवक-युवतींसाठी स्वावलंबनाचा मजबूत हातभार ठरणाऱ्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला चालू २०२५-२६ या आर्थिक वर्षात तब्बल ७५० कोटींचा निधी शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे. या निधीपैकी ३०० कोटी रुपये थेट महामंडळाकडे वर्ग करण्यात आले आहेत. त्यामुळे महामंडळामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांच्या अंमलबजावणीत गती येणार असून, अधिकाधिक तरुण-तरुणींना या योजनांचा लाभ मिळणार आहे.
महामंडळाने फेब्रुवारी २०१८ ते ऑगस्ट २०२५ पर्यंत केलेले अर्थआहाय्य
- एकूण बॅंक कर्ज मंजूर लाभार्थी : ९ हजार १०१
- बॅंकेने वितरित केलेेले एकूण कर्ज रक्कम : ९१८ कोटी ५४ लाख
- महामंडळाने केलेला व्याज परतावा : ८८ कोटी ९३ लाख
- व्याज परतावा मिळालेले लाभार्थी : ८ हजार ३१२
- व्याज परताव्यासाठी मंजूर लाभार्थी : ८ हजार ७४१
अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या व्याज परतावा योजनेमुळे अनेक नवउद्योजकांना मोठे लाभ झाले आहेत. कार्यालयातून योजनेविषयी माहिती घ्यावी. अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाइन आहे. एजंटांच्या भूलथापांना बळी पडू नये. पोर्टलवरती व्हिडीओज आहेत, ते पाहूनही नाेंदणीची प्रक्रिया करता येऊ शकते. -निशा पाटील, जिल्हा समन्वयक, अण्णासाहेब पाटील महामंडळ