अण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे तालुकानिहाय समन्वयक नेमणार, नरेंद्र पाटील यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 14:15 IST2023-04-10T14:14:48+5:302023-04-10T14:15:07+5:30
सवलतीच्या दरात ट्रॅक्टर देणार

अण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे तालुकानिहाय समन्वयक नेमणार, नरेंद्र पाटील यांची घोषणा
सांगली : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत कर्ज प्रकरणांच्या निर्गतीसाठी तालुकानिहाय समन्वयक नेमणूक केली जाईल, अशी घोषणा महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केली.
सांगलीत रविवारी महामंडळाच्या योजनांचे लाभार्थी व बँक यांच्यात संवाद मेळावा झाला, त्यावेळी पाटील बोलत होते. आमदार सुधीर गाडगीळ, मानसिंगराव नाईक, माजी आमदार दिनकर पाटील, इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील, सत्यजित देशमुख, दीपक शिंदे-म्हैसाळकर, पृथ्वीराज पवार आदी उपस्थित होते. पाटील म्हणाले, राज्यात महामंडळाच्या ६० हजार लाभार्थ्यांना ४ हजार ६२ कोटींचे कर्जवाटप केले आहे. ३९० कोटींचा व्याज परतावा दिला आहे. कर्ज वाटपात सांगली जिल्ह्यात चांगले काम झाले असून २४ कोटींचा व्याज परतावा दिला आहे. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची मर्यादा १० लाखांहून १५ लाखांपर्यंत वाढविली आहे. छोट्या उद्योगासाठी दोन लाखांपर्यंतचे कर्ज प्रकल्प अहवालाशिवाय मिळते.
आमदार गाडगीळ म्हणाले, आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांना मदतीसाठी, तसेच पदवी घेतल्यानंतर पुढील वाटचालीच्या मार्गदर्शनासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. आमदार नाईक म्हणाले, महामंडळाच्या योजनांची कर्ज प्रकरणे जिल्हा बँकेकडूनही मंजूर केली जात आहेत. आतापर्यंत ५ कोटी ५२ लाख रुपयांचे कर्ज वितरण केले आहे.
यावेळी महामंडळाच्या योजनांचा लाभ घेतलेल्या यशस्वी लाभार्थ्यांचा व कर्ज वितरणात उत्कृष्ट काम केलेल्या बँक प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. शाहीर प्रसाद विभुते यांचाही सत्कार झाला. प्रास्ताविक उपमहाव्यवस्थापक आकाश मोरे यांनी केले. सूत्रसंचालन जयदीप जाधव यांनी केले.
कार्यक्रमाला संजय पाटील, रोहित देशमुख, विलास देसाई, प्रशांत भोसले, विजयसिंह चव्हाण, महेंद्र जगदाळे, नानासाहेब शिंदे, श्रीकांत शिंदे आदी उपस्थित होते.
सवलतीच्या दरात ट्रॅक्टर देणार
नरेंद्र पाटील म्हणाले, महामंडळामार्फत ट्रॅक्टर योजनाही लवकरच सुरू करणार आहोत. थेट उत्पादक कंपनीकडून विशेष सवलतीच्या दरात ट्रॅक्टरसाठी मागणी केली आहे.