अनिकेत कोथळेचा खून कट रचूनच! : जिल्हा न्यायालयास सादर; नोव्हेंबरमध्ये पुढील सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 00:40 IST2018-10-17T00:39:18+5:302018-10-17T00:40:56+5:30
अनिकेत कोथळे याचा कट रचून खून करण्यात आला आहे, यासह असे एकूण दहा आरोप मंगळवारी बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटेसह सातजणांविरुद्ध जिल्हा न्यायालयात प्रस्तावित करण्यात आले.

अनिकेत कोथळेचा खून कट रचूनच! : जिल्हा न्यायालयास सादर; नोव्हेंबरमध्ये पुढील सुनावणी
कोठडीत मारले आंबोलीत जाळले
सांगली : अनिकेत कोथळे याचा कट रचून खून करण्यात आला आहे, यासह असे एकूण दहा आरोप मंगळवारी बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटेसह सातजणांविरुद्ध जिल्हा न्यायालयात प्रस्तावित करण्यात आले. या खटल्याची पुढील सुनावणी नोव्हेंबरमध्ये ठेवण्यात आली आहे.
सांगली शहर पोलिसांनी ६ नोव्हेंबर २०१७ रोजी अनिकेत कोथळे व त्याचा मित्र अमोल भंडारे यांना लूटमारीच्या गुन्ह्यात अटक केली होती. गुन्हा कबूल करण्यासाठी अनिकेतला मारहाण केली होती. यात त्याचा मृत्यू झाल्याने, पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे नेऊन जाळला होता. कामटेसह बडतर्फ पोलीस हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, राहुल शिंगटे, नसरुद्दीन मुल्ला, झिरो पोलीस झाकीर पट्टेवाले, कामटेचा मामेसासरा बाबासाहेब कांबळे या सातजणांना अटक केली होती.
या खटल्यात सरकारतर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम काम पाहत आहेत. मंगळवारी अॅड. निकम यांनी कामटेसह सात संशयितांविरुद्ध दहा आरोप प्रस्तावित केले. कामटेसह सातही संशयितांनी अनिकेतच्या खुनाचा कट रचला. लूटमारीच्या गुन्ह्यात अनिकेतसह त्याचा मित्र भंडारेला अटक केली. अन्य गुन्हे कबूल करुन घेण्यासाठी अनिकेतला बेदम मारहाण केली. त्याचा मृत्यू झाल्यानंतर याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविणे गरजेचे होते.
पण प्रकरण अंगलट येऊ नये, यासाठी संशयितांनी त्याचा मृतदेह आंबोलीतील महादेवगड येथे नेऊन जाळला. यामध्ये शिक्षा होऊ शकते, हे माहीत असतानाही त्यांनी पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. हेही कृत्य सर्वांनी संगनमताने केले. अनिकेतचा खून केला असताना, तो पळून गेल्याचा बनाव रचला. तशी खोटी फिर्याद देऊन अधिकाºयांची दिशाभूल करुन शांतता बिघडविण्याचा प्रयत्न केला. भंडारेलाही बेदम मारहाण केली. त्याला पिस्तुलाचा धाक दाखविला, असे दहा आरोप प्रस्तावित करण्यात आले आहेत. यावरील पुढील सुनावणी नोव्हेंबरपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.
मुख्य पुरावाही नष्ट
सांगली शहर पोलीस ठाण्यात व आवारात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. अनिकेतचा मृतदेह बाहेर नेताना हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. हा महत्त्वाचा पुरावा होता. पण कामटे, लाड व टोणे या तिघांनी संगनमत करुन सीसीटीव्हीचा डीव्हीआर नष्ट केला. हे कृत्यही त्यांनी संगनमताने केले, या आरोपाचाही समावेश करण्यात आला आहे.