उद्योजकांवरील गुन्ह्यांमुळे संताप
By Admin | Updated: January 26, 2015 00:36 IST2015-01-26T00:35:43+5:302015-01-26T00:36:41+5:30
कारवाईबद्दल नाराजी : परप्रांतीय कामगारांची माहिती न दिल्याचे प्रकरण

उद्योजकांवरील गुन्ह्यांमुळे संताप
सांगली : परप्रांतीय कामगारांची माहिती न दिल्याप्रकरणी दोन उद्योजकांवर कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी गुन्हे दाखल केल्यामुळे कुपवाड, मिरज एमआयडीसीमधील उद्योजकांमधून संताप व्यक्त होत आहे. एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे उद्योजकांवर गुन्हे दाखल करण्याची पोलिसांची भूमिका चुकीची असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. येत्या दोन दिवसांत याप्रश्नी जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांची भेट घेणार असल्याचे उद्योजकांनी सांगितले.
कामगारांची माहिती न दिल्याप्रकरणी पोलिसांनी रावसाहेब केदारी माळी (तारा इंडस्ट्रीज, मिरज एमआयडीसी), परेश चंपकलाल शहा आणि विपुल चंपकलाल शहा (योगी कार्पोरेशन, एमआयडीसी कुपवाड) यांच्यावर गुन्हे दाखल केले होते. त्याचबरोबर कामगार भाडेकरुंची माहिती न दिलेल्या अकरा घरमालकांवरही गुन्हे दाखल केले आहेत. उद्योजकांवर केलेल्या कारवाईमुळे उद्योजकांमधून संताप व्यक्त होत आहे. गुन्हेगारांप्रमाणे उद्योजकांना पोलिसांनी वागणूक दिल्याची भावना काही उद्योजकांनी व्यक्त केली.
पोलिसांनी पन्नास सार्वजनिक ठिकाणी आदेशाच्या प्रती भिंतीवर चिकटविल्या होत्या. याप्रकरणी कुपवाड पोलिसांची विशेष पथकेही तैनात झाली आहेत. घरमालकांनी भाडेकरुंची, तर उद्योजकांनी कामगारांची माहिती द्यावी, अशी सूचना पोलिसांनी दिली होती. प्रत्यक्षात याठिकाणचे औद्योगिक क्षेत्र मोठे आहे. पोलिसांनी एकदा सूचना देऊन लगेच कारवाई केल्यामुळे उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
या कारवाईप्रकरणी उद्योजकांचे शिष्टमंडळ येत्या दोन दिवसात जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांची भेट घेणार आहे. उद्योजकांना नाहक त्रास देण्यात येऊ नये, अशी मागणी उद्योजकांनी केली आहे.
संघटनेकडूनही सूचनापत्रक
औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांनी जिल्हा पोलीस प्रमुखांच्या आदेशानुसार कामगारांची माहिती पोलीस ठाण्यात द्यावी, अशी सूचना सांगली, मिरज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने स्वतंत्र पत्रकाद्वारे उद्योजकांना दिली आहे. संघटनेच्या कार्यक्षेत्रातील उद्योगांना त्यांनी याबाबत लेखी कळविले आहे. संघटनेकडूनही प्रयत्न सुरू असतानाच पोलिसांनी गुन्हे दाखल केल्यामुळे संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे.