...तर विधानसभेला मिरजेत राष्ट्रवादीची बंडखोरी
By Admin | Updated: July 31, 2014 00:19 IST2014-07-31T00:15:31+5:302014-07-31T00:19:32+5:30
बैठकीत इशारा : अजितराव घोरपडेंची अनुपस्थिती, मात्र समर्थकांची हजेरी

...तर विधानसभेला मिरजेत राष्ट्रवादीची बंडखोरी
मिरज : मिरज विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्यात यावा, अन्यथा येथे शिराळ्याप्रमाणे बंडखोरी करुन उमेदवार निवडून आणू, असा इशारा राष्ट्रवादीचे पक्षनिरीक्षक शहाजीबापू पाटील यांनी दिला.
मिरजेत तालुक्यातील राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. महिला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा डॉ. उषाताई दशवंत, युवती जिल्हाध्यक्षा अर्चना कदम, पक्षनिरीक्षक बाळासाहेब पाटील, मुकुंद कांबळे, शहाजी पाटील, मनोज शिंदे, तासगावच्या सौ. नलिनी पवार, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा. प्रमोद इनामदार, परशुराम नागरगोजे, दीपक शिंंदे उपस्थित होते.
मिरज मतदारसंघात भाजपविरोधी वातावरण आहे, तर काँग्रेसकडे सक्षम उमेदवार नसल्याने मिरजेत राष्ट्रवादीचा उमेदवार देण्याची मागणी प्रा. प्रमोद इनामदार यांनी बैठकीत केली. यावेळी पक्षनिरीक्षक शहाजीबापू पाटील म्हणाले, मिरजेची जागा राष्ट्रवादीसाठी मागण्यात येईल. मिरजेत काँग्रेसकडे भाजपशी लढत देणारा उमेदवार नाही. गत निवडणुकीत काँग्रेसने येथे कमकुवत उमेदवार देऊन भाजपची मदत केली होती. मात्र यावेळी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील मिरजेची जागा राष्ट्रवादीसाठी खेचून आणणार आहेत. मिरज मतदासंघ राष्ट्रवादीला न मिळाल्यास येथे बंडखोरी करुन शिराळ्याप्रमाणे येथेही राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आणू, असे पाटील म्हणाले. येथे भाजपचा उमेदवार अपघाताने निवडून आल्याचा दावाही त्यांनी केला. पुढील आमदार राष्ट्रवादीच्या चिन्हावर किंवा राष्ट्रवादीतून बंडखोरी करुन निवडून आलेला असेल, असेही त्यांनी सांगितले.
मोहनराव शिंदे साखर कारखान्याचे अध्यक्ष मनोज शिंदे यांनी, विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कार्यकर्ते तयार असल्याचे सांगितले. हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच हवा अशी मागणी केली.
या बैठकीस राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्यांसह अजितराव घोरपडे यांचे समर्थक परशुराम नागरगोजे, बाजार समितीचे माजी सभापती भारत कुंडले, डोंगरवाडीचे सरपंच दीपक शिंदे उपस्थित होते. (वार्ताहर)