लग्नात फुलांच्या अक्षता, पुस्तकांचा रुखवत अन् विचारांचा जागर; सांगलीत अनोखा सत्यशोधक विवाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2022 20:05 IST2022-10-29T20:02:12+5:302022-10-29T20:05:39+5:30

वधू-वरांनी हाती भारतीय संविधान घेऊन लग्न मंडपात प्रवेश केला. त्यांनी संविधानाची प्रस्तावना ही म्हटली.

An unique truth seeker marriage in Sangli | लग्नात फुलांच्या अक्षता, पुस्तकांचा रुखवत अन् विचारांचा जागर; सांगलीत अनोखा सत्यशोधक विवाह

लग्नात फुलांच्या अक्षता, पुस्तकांचा रुखवत अन् विचारांचा जागर; सांगलीत अनोखा सत्यशोधक विवाह

अविनाश कोळी

सांगली - वधू-वराच्या डोईवर तांदळाऐवजी बरसणाऱ्या सुगंधी फुलांच्या अक्षता...लग्नमंडपात सजलेला पुस्तकांचा रुखवत...महापुरुषांच्या विचारांचा जागर अशा वातावरणात गुरुवारी सांगलीत अनोखा सत्यशोधक विवाह पार पडला.

करोली-एम (ता. मिरज) येथील सायली संजय देशमुख व काले ((ता. कराड, जि. सातारा) येथील सुजित सुहास थोरात या दोघांचा अनोखा विवाह सध्या चर्चेत आहे. मराठा समाज संस्था, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या विवाहात पुढाकार घेतला. अनेक वैशिष्ट्यांनी हा सोहळा रंगला. तांदळाच्या अक्षता मधून होत असलेली अन्नाची नासाडी रोखण्यासाठी फुलांच्या अक्षता बरसविण्यात आल्या. नेहमीच्या मंगलाष्टकांऐवजी महात्मा फुले यांनी लिहिलेल्या पर्यावरणवादी, स्त्री-पुरुष समानतावादी मंगलाष्टका यावेळी सादर करुन लग्नसमारंभ रंगविण्यात आला.

मानवी जीवनाच्या निर्मितीचे प्रतिक म्हणून पृथ्वीचे पूजन, वृक्षारोपण, राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन असे उपक्रम ही या सोहळ्याचाच भाग होते. वधू-वरांचे पालक तसेच निवडक नातेवाईकांचा पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. रुखवत म्हणून भांडी-कुंडीऐवजी प्रबोधनात्मक पुस्तके ठेवली होती. समाजामध्ये वैज्ञानिक आणि पुरोगामी विचारांचा प्रसार व्हावा, हा यामागचा हेतून होता. वधू-वरांनी हाती भारतीय संविधान घेऊन लग्न मंडपात प्रवेश केला. त्यांनी संविधानाची प्रस्तावना ही म्हटली.

या सोहळ्यास फुले, शाहू, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आदींच्या वेशभूषा धारण करुन काहींनी सहभाग घेतला. इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांचे यावेळी व्याख्यान झाले. कुंडली न बघता कर्तृत्व बघा. स्त्री पुरुष समानता पाळा, असे संदेश त्यांनी उपस्थितांना दिले. मराठा समाजाचे उपाध्यक्ष ए. डी. पाटील व संजय गोविंदराव देशमुख (इंगवले) यांनी स्वागत केले. यावेळी मराठा समाज संस्था, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, मराठा सोशल ग्रुप, मराठा सेवा संघाचे प्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते. प्रा. डॉ. विजय गायकवाड (इस्लामपूर) यांनी पौरोहित्य केले. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विवाहास हजेरी लावली होती.
 

Web Title: An unique truth seeker marriage in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली