सांगलीत उद्यानाजवळ अनोळखी मृतदेह आढळला, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली
By शीतल पाटील | Updated: February 22, 2023 21:09 IST2023-02-22T21:09:09+5:302023-02-22T21:09:14+5:30
दुकानाच्या मागील बाजूस एका पडक्या खोलीत एकाचा मृतदेह असल्याचे निदर्शनास आले

सांगलीत उद्यानाजवळ अनोळखी मृतदेह आढळला, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली
सांगली : येथील प्रतापसिंह उद्यानाजवळील सार्वजनिक स्वच्छतागृहाजवळ बुधवारी एका अनोळखी व्यक्तीचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. रात्री उशीरापर्यंत मृतदेहाची ओळख पटली नव्हती.
अधिक माहिती अशी, की शहर पोलिस ठाण्याजवळील प्रतापसिंह उद्यानासमोर खोकी आहेत. त्याठिकाणच्या व्यावसायिकांना उग्रवास येत असल्याने संशय बळावला. त्यांनी शहर पोलिस ठाण्यात याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. एका दुकानाच्या मागील बाजूस एका पडक्या खोलीत एकाचा मृतदेह असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तातडीने एसआरएफ टीमला पाचारण केले. सडलेल्या अवस्थेतील मृतदेह पुरूषाचा असून त्याची ओळख पटली नव्हती. उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अभिजीत देशमुख यांच्यासह पथक घटनास्थळी होते. एसआरएफचे कैलास वडर, सुमीत गायकवाड, बापू शेंडगे, अमीर नदाफ, निहाल शेख, शिवराज टाकळे यांनी पोलिसांना सहकार्य केले.