सांगली : नवीन शैक्षणिक धोरणात मोठे बदल करण्यात आले आहेत. त्यामध्ये शिक्षकांवर मोठी जबाबदारी आहे. रोबोटिकची माहिती लहानपणापासून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्कृष्ट खेळाडू तयार होण्यासाठी शिक्षकांनी प्रामाणिक प्रयत्न करावेत, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.जिल्हा परिषदेतर्फे गुरुवारी आदर्श शिक्षक पुरस्कार आणि ‘पद्मभूषण वसंतदादा पाटील क्रीडा पुरस्काराचे वितरण पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार इद्रिस नायकवडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे, प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, महेश धोत्रे, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ उपस्थित होते.पाटील म्हणाले, अंगणवाडी, प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिकच्या पाचवी, सहावीच्या अभ्यासक्रमात काही बदल करण्यात येत आहेत. अंगणवाडी शिक्षणावर भविष्यात केंद्राचे नियंत्रण असणार आहे. आतापर्यंत ४४९ शाळा मॉडेल स्कूल केल्या आहेत. चौथ्या टप्प्यातील शाळांसाठी ४८ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. शाळांमध्ये सोलर पॅनेल लावले आहेत. उत्कृष्ट खेळाडूंना शासकीय सेवेची संधी आहे. मात्र नोकरी आणि पदकासाठीच न खेळता देशासाठी खेळावे. यावेळी आमदार इद्रिस नायकवडी यांनीही मार्गदर्शन केले.
पुरस्कारप्राप्त खेळाडू, मार्गदर्शक असेगौरव भाट, प्रद्युम्न पाटील, मनस्वी भंडारे, सोनाली जाधव, आरती केंगारे, श्रेया हिप्परगी, योगेश पाटील, विजयकुमार शिंदे, विकास माळी, विशाल काळेल, अथर्व धज, तेजस्विनी पाटील, रामदास कोळी, अवधूत पाटील, सचिन ढोले, विनोद राठोड.
यांना मिळाला आदर्श शिक्षक पुरस्कारकाकासाहेब कदम, नीलेश गोंजारी, नीलेश टकले, भानुदास चव्हाण, विष्णू रोकडे, रेहाना नदाफ, विनोदकुमार पाटील, गोपाल पाटसुपे, प्रताप गायकवाड, गिरीश मोकाशी, भाग्यश्री होर्तीकर या शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.