वीजबिल घोटाळ्याच्या रकमेची कर्मचाऱ्यांच्या पगारातून वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:26 AM2021-03-18T04:26:53+5:302021-03-18T04:26:53+5:30

सांगली : महापालिकेच्या वीजबिल घोटाळ्याप्रकरणी आयुक्त नितीन कापडणीस यांनी विद्युत व लेखा विभागातील कर्मचाऱ्यांना दणका दिला आहे. यातील ३० ...

The amount of electricity bill scam was recovered from the salaries of the employees | वीजबिल घोटाळ्याच्या रकमेची कर्मचाऱ्यांच्या पगारातून वसुली

वीजबिल घोटाळ्याच्या रकमेची कर्मचाऱ्यांच्या पगारातून वसुली

Next

सांगली : महापालिकेच्या वीजबिल घोटाळ्याप्रकरणी आयुक्त नितीन कापडणीस यांनी विद्युत व लेखा विभागातील कर्मचाऱ्यांना दणका दिला आहे. यातील ३० लाखांची रक्कम १७ कर्मचाऱ्यांच्या पगारातून वसूल करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. बिलाचे लेखापरीक्षणही केले जाणार असून, त्याच्या अहवालानंतर दोषींवर पुढील कारवाईचा प्रस्ताव ठेवला जाणार असल्याचे समजते.

महापालिकेकडे विविध कार्यालये, पाणीपुरवठा, दिवाबत्तीसह २५०हून अधिक वीजमीटर आहेत. या कार्यालयांच्या विजेची बिले दरमहा विद्युत विभागाकडे येत होती. या बिलापोटीची रक्कम शहरातील खासगी भरणा केंद्राकडे जमा केली जाते. या केंद्राच्या वतीने बिलाची रक्कम महावितरणकडे जमा होत होती. पण वर्षभरापासून अनेक विभागांची वीजबिले भरली गेलेली नाहीत. नोव्हेंबरमध्ये महावितरणकडून महापालिकेला थकीत वीजबिल भरण्याबाबत पत्र आल्यानंतर घोटाळा समोर आला होता. नागरिक जागृती मंच, सर्वपक्षीय कृती समितीने आयुक्त कापडणीस यांच्याकडे चौकशीची मागणी केली होती. दरम्यान, महापालिकेने पोलिसांत घोटाळ्याची तक्रार दिली होती. त्यानुसार तीन ते चार जणांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, आयुक्त कापडणीस यांच्या आदेशाने या घोटाळ्याची प्राथमिक चौकशी करण्यात आली होती. या चौकशीत ३० लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचा अहवाल लेखाधिकाऱ्यांनी आयुक्तांकडे सादर केला होता. त्यानंतर उपायुक्त राहुल रोकडे यांनाही या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते.

आता आयुक्तांनी या घोटाळ्यातील ३० लाख रुपये रकमेची वसुली करण्याचा निर्णय घेतला. तसा अहवाल उपायुक्तांकडून सादर झाल्याचे समजते. वीजबिलाची तपासणी करून धनादेश काढण्यापर्यंतच्या प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. विद्युत, लेखा व लेखापरीक्षक विभागातील १७ कर्मचारी रडारवर असून, त्यांच्या पगारातून घोटाळ्याची रक्कम वसूल करण्याचे आदेश दिले जाणार असल्याचे समजते.

चौकट

वीजबिलाचे लेखापरीक्षण

वीजबिल व त्याचा भरणा याचे लेखापरीक्षण करण्यासाठी स्वतंत्र लेखापरीक्षकाची नियुक्ती केली आहे. सध्या हा घोटाळा ३० लाखांचा गृहीत धरून कर्मचाऱ्यांच्या पगारातून वसुली होणार आहे. अहवालात रक्कम वाढल्यास त्याचीही वसुली केली जाणार असल्याची चर्चा आहे.

Web Title: The amount of electricity bill scam was recovered from the salaries of the employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.