जिल्ह्यात आजपासून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व ‘लॉक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:18 IST2021-06-28T04:18:41+5:302021-06-28T04:18:41+5:30
सांगली : जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येतील वाढीमुळे प्रशासनाने पुन्हा कडक निर्बंध लागू केले आहेत. पॉझिटिव्हिटी रेट वाढल्याने जिल्ह्याचा चौथ्या स्तरात ...

जिल्ह्यात आजपासून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व ‘लॉक’
सांगली : जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येतील वाढीमुळे प्रशासनाने पुन्हा कडक निर्बंध लागू केले आहेत. पॉझिटिव्हिटी रेट वाढल्याने जिल्ह्याचा चौथ्या स्तरात समावेश झाल्याने आज, सोमवारपासून पुढील आठवडाभर अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, सेवा बंद राहणार आहेत. अत्यावश्यक सेवांना दुपारी चारपर्यंत वेळ देण्यात आलेली वेळ मात्र, कायम असणार आहे.
जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट व ऑक्सिजन बेडची उपलब्धता यावर निर्बंध कडक अथवा शिथिल करण्याबाबतचा निर्णय शासनाने जिल्हा प्रशासनावर सोपवला आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांपेक्षा अधिक आढळल्याने तिसऱ्या स्तरातून चौथ्या स्तरात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय शासनाने आता केवळ आरटीपीसीआर चाचण्या गृहीत धरुन पॉझिटिव्हिटी रेट काढण्याचा निर्णय घेतल्याने निर्बंध अधिक कडक केले जाणार आहेत.
तिसऱ्या स्तरात जिल्ह्यातील सर्व व्यवहारांना दुपारी चारपर्यंत परवानगी देण्यात आली होती. मात्र, बाजारपेठेतील वाढत्या गर्दीमुळे पुन्हा कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. त्यामुळे आता अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. नव्या निर्बंधांची अंमलबजावणी करतानाच बाजारपेठेत पुन्हा गर्दी होणार नाही यासाठीही पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.
चौकट
चौथ्या स्तरातील निर्बंध दृष्टिक्षेपात
* किराणा, भाजीपाला, फळेविक्री, दूध, मिठाई, बेकरीसह इतर खाद्य दुकाने या अत्यावश्यक सेवा दुपारी चारपर्यंत सुरु.
* अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व प्रकारची दुकाने बंद राहतील.
* बाजार समिती, फळ मार्केट, भाजी मंडई सकाळी सात ते दुपारी ४ सुरु
* सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार बंद राहणार मात्र, पार्सल सुविधा देण्यास परवानगी.
* जिल्ह्यातील आठवडी बाजार बंद राहणार
* हातगाडीवरील खाद्य विक्रेत्यांना ग्राहकांना प्रत्यक्ष खाण्यासाठी पदार्थ देण्यास प्रतिबंध असेल मात्र, पार्सल अथवा घरपोच सेवा देता येईल.
* सिनेमागृह, नाट्यगृहे, सभागृहे बंद राहणार
* सलून, ब्युटी पार्लर, व्यायामशाळा सोमवार ते शुक्रवार दुपारी चारपर्यंत ५० टक्के क्षमतेसह सुरु राहतील.
* २५ नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्नाला परवानगी असेल.